चाकूर येथील डॉ. संजय शिवप्पा हुडगे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, आयडीए या संघटनांनी उद्या (शनिवारी) सर्व रुग्णालयातील बाहय़रुग्ण विभाग बंद ठेवण्याचे ठरविले आहे. आपत्कालीन सुविधा मात्र सुरू राहणार आहे.
चाकूर येथील डॉ. हुडगे यांच्या रुग्णालयात गेल्या २९ सप्टेंबरला खुर्दळी येथील चामले कुटुंबीयांनी सात वर्षांच्या बालकास उपचारासाठी आणले. त्याला झटके येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बाळाला घरी घेऊन जायचे आहे, असा आग्रह कुटुंबीयांनी धरला. त्याच्यावर उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगूनही कुटुंबीयांनी बाळाला घरी नेले. पुन्हा सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान ते बाळाला घेऊन आले, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगताच कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केली. पोलिसांनाही या स्थितीची कल्पना आपण दिली होती. मात्र, थोडय़ा वेळेने रुग्णाच्या नातेवाईकांनी येऊन लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांना टाके पडले. हाताची बोटे व मनगटाचे हाडही मोडले. या हल्ल्याचा जिल्हय़ातील डॉक्टरांनी तीव्र निषेध केला. जिल्हय़ातील डॉक्टर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.