अडचणीत असणाऱ्या मजुरांकडून अर्जासह दाखल्यासाठी लूट

विरार :  गावी जाणाऱ्या मजुरांना गावी जाण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सक्ती करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याने तो भरून देण्यासाठी नालासोपाऱ्यात १०० रुपयात अर्ज भरून देण्याची दुकाने थाटली जात आहेत. यात आता काही खाजगी डॉक्टरांनी उडी घेतली आहे. अर्जाबरोबर  वैद्यकीय दाखल्यासाठी अतिरिक्त १०० रुपये मोजावे लागत आहेत.  ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही त्यांना २५० रुपये द्यावे लागत आहेत.

नालासोपारा आणि महामार्गाच्या आसपास असलेल्या औद्योगिक वसाहती कारखान्यात तसेच इतर छोटय़ा मोठय़ा कंपनीत हजारो मजूर राहत आहेत. टाळेबंदीत हाताचे काम गेल्याने त्यांना आपल्या गावी जायचे आहे. पण शासकीय प्रक्रिया ही डिजिटल असल्याने अनेक मजुरांना ती पूर्ण करता येत नाही. याचा फायदा घेत नालासोपारा, संतोष भुवन, धानीव बाग, बिलाल पाडा, जुचंद्र, गडगापाडा आणि आसपासच्या परिसरात या मजुरांचे अर्ज भरण्यासाठी दुकाने थाटली जात आहेत.   वैद्यकीय दाखल्याची वैधता केवळ तीन दिवसाची असली तरी अर्ज दाखल करणाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिले जात आहे. यासाठी कोणतही वैद्यकीय चाचणी न करता हे प्रमाणपत्र दिले जात आहेत.

रोज संध्याकाळी नालासोपारा पूर्वेला टेबल मांडून हा धंदा सुरू आहे. लोकांना गावी जाण्याची गरज असल्याने लोक विनातक्रार करत पैसे देऊन आपला अर्ज भरून घेत आहेत. पण यामुळे या मजुरांची फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. विनयकुमार मिश्रा हे वसईच्या एका कंपनीत कामगार होते. पण टाळेबंदीमुळे त्यांची नोकरी गेली म्हणून यांना उत्तरप्रदेश येथे आपल्या गावी जायचे होते.

त्यांनी आठवडय़ापूर्वी अशाच पद्धतीने अर्ज भरला आणि वैद्यकीय दाखला घेतला आहे. पण अजूनही त्यांना कोणतेही उत्तर आले नाही. ज्या ठिकाणी अर्ज भरला त्यांनी केवळ तुमच्या मोबाइलवर संदेश येईल इतकेच सांगितले जाते. आणि वैद्यकीय दाखल्याची वैधता संपली आहे. त्यांना शासनाकडून उत्तर जरी आले तरी पुन्हा दाखला बनवावा लागणार आहे आणि त्यासाठी पुन्हा पैसे मोजावे लागतील.

मिश्रा यांच्यासारखे शेकडो मजूर या परिसरात आहेत. ज्यांनी अर्ज तर भरला आहे, पण कोणतेही उत्तर आले नाही. यामुळे येथील मजुरांची काही नफेखोरांनी फसवणूक केली आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.