23 November 2017

News Flash

जळगावमध्ये डॉक्टरची निर्घृण हत्या

अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव | Updated: September 11, 2017 10:38 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

जळगाव जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५६, रा.पार्वती नगर, जळगाव, मूळ रा.नाशिक) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. मोरे जळगावमध्ये कुष्ठरोग विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत होते. जिल्हा रुग्णालय आवारात त्यांचे स्वतंत्र कार्यालय होते. त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक जालीम जाधव आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांना घेण्यासाठी पार्वती नगर येथील त्यांच्या घरी गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांनी ही घटना तातडीने त्यांच्या कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

First Published on September 11, 2017 7:45 pm

Web Title: doctor murder in jalgaon