नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळबजबरीने गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांकडून आता गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात येणार आहे. ही माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली. या गुन्ह्य़ातील आरोपी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह तिघे फरार असून त्यांचा शोध चंद्रपूर व इतरत्र सुरू आहे.

विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी मंडळाचे उपाध्यक्ष पीयूष पांडुरंग आंबटकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा तर  बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर व आंबटकर यांचे जावाई अमोल रघटाटे यांच्याविरुद्ध विविध कलमांसह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान तरुणीचा गर्भपात करणारे विम्स हॉस्पिटलचे डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. लवकरच पोलिसांचे पथक या डॉक्टरांचीही चौकशी करणार आहे. पीडित तरुणी उच्च शिक्षण घेत असून दीड वर्षांपूर्वी फेसबूकद्वारे तिचा संबंध पीयूष याच्याशी आला. त्यानंतर त्याने तिच्यावर सतत अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. गर्भपात करण्यासाठी तिने नकार दिला. पीयूषने आपल्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी उपचार करण्याच्या बहाण्याने सदरमधील विम्स रुग्णालयात तिचा गर्भपात केला. त्यानंतर तरुणीला धमकावण्यात आले. मात्र, ‘मी टू’ मोहिमेमुळे तिने हिंमत करून आता पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरोपींच्या अटकेसाठी सोनेगाव पोलिसांचे पथक चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. तिघेही फरार आहे. लवकरच तिघांना अटक करण्यात येईल. गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचीही याप्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगितले.