पहिले लग्न झाल्याची बाब दडवून दुसरे लग्न करत या डॉक्टर पत्नीचा माहेरून पैसे व अन्य किंमती साहित्य आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पुण्यातील एका डॉक्टरला शनिवारी येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य चार संशयितांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.
पुण्यातील सचिन हरी देशपांडे असे या डॉक्टर पतीचे नांव आहे. या प्रकरणी पत्नी डॉ. ममता देशपांडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डॉ. सचिनचे पहिले लग्न झाले असताना पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता ही बाब दडवून आपल्याशी विवाह केल्याचे डॉ. ममता यांनी तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर माहेरून पैसे व किंमती साहित्य आणावे आणि मुलगी झाली या कारणावरून सासरच्या मंडळींनी वेळोवेळी मारहाण केली. या प्रकरणी पती डॉ. सचीन याच्यासह सासरे हरी दत्तात्रय देशपांडे, सासू स्मिता देशपांडे, दीर अजित हरी देशपांडे व जाऊ अश्विनी देशपांडे या पाच जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2013 2:24 am