जिल्हय़ात तापाचे व डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत असले तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची संख्या मात्र पुरेशी नाही. जिल्हय़ातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९० पदे मंजूर असली, तरी प्रत्यक्षात यातील २८ जागा रिक्तच आहेत. त्यातच उपलब्ध अनेक डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी राहण्याऐवजी बाहेरून ये-जा करतात, अशी जिपतील काही विरोधी सदस्यांची तक्रार आहे.
अधिकृत माहितीनुसार गेल्या एप्रिलपासून जिल्हय़ात डेंग्यूचे १९१ संशयित रुग्णांचे नमुने मलेरिया विभागाने घेतले. तपासणीनंतर २८ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पैकी चार रुग्णांचा मृत्यू तापाने झाला. यासंदर्भात अंतिम अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. जिप आरोग्य विभागाच्या वतीने १५ दिवसांपूर्वी विशेष सभेत दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूच्या १६६ संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले. पैकी २१ नमुने पॉझिटिव्ह आढळले. जिपतील विरोधी सदस्यांना डेंग्यूच्या रुग्णांची शासकीय पातळीवरील आकडेवारी मान्य नाही. जिपच्या मागील विशेष सभेत पंकज बोराडे यांनी प्रत्येक तालुक्यात डेंग्यूचे १०० ते २०० दरम्यान रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले होते. बहुसंख्य रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याऐवजी खासगी डॉक्टरांकडे जात आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांचा खरा आकडा शासकीय आकडेवारीपेक्षा मोठा आहे. राष्ट्रवादीचे जिपचे गटनेते सतीश टोपे यांच्या म्हणण्यानुसार घनसावंगी व अंबड तालुक्यातील डेंग्यूचे अनेक रुग्ण औरंगाबादला उपचार घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतात व नियुक्तीवर असलेले अनेक डॉक्टर मुख्यालयी राहण्याऐवजी बाहेरून ये-जा करतात. त्यामुळे रुग्णांची मोठय़ा प्रमाणात हेळसांड होते.
जिल्हय़ातील शहागड, राजाटाकळी, वाटूर, वालसावंगी, सातोना, खासगाव येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची दोन्ही पदे रिक्त आहेत. सेवली, दाभाडी, गोंदी, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, ढोकसाळ, दहीफळ खंदारे, केदारखेडा, राजूर, धावडा, आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, वरुड बु., भारज या केंद्रातील डॉक्टरांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे.
दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये ८ तालुक्यांतील आरोग्य केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या १ हजार २७९ पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी अनेक नमुने दूषित निघाले. जालना ५३, मंठा ३४, अंबड ३०, परतूर २८ याप्रमाणे काही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याच्या दूषित नमुन्यांची संख्या आहे.