लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू व रुग्ण संख्या वाढीचे सत्र कायम आहे. जिल्ह्यातील आणखी तिघांचा मृत्यू व ११ नवे रुग्ण रविवारी आढळून आले. अकोल्यातील रहिवासी व मेळघाटात सेवा देणाऱ्या करोना योद्धा डॉक्टरचाही करोनामुळे बळी गेला. बाळापूर येथील एका रुग्णाचाही काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अकोल्यातून नागपूर येथे पाठवलेल्या एका करोनाबाधित महिला रुग्णाचाही रविवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जणांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५८१ वर पोहोचली. सध्या ११७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात करोना वेगाने पसरत असून, मृत्यूची संख्याही चांगलीच वाढत आहे. आणखी तीन मृत्यू आणि ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ५३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ४२ अहवाल नकारात्मक, तर ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एक ३८ वर्षीय रुग्ण सुधीर कॉलनी येथील रहिवासी होते. ते डॉक्टर होते. त्यांनी मेळघाटमध्ये आपली सेवा प्रदान केली. मेळघाटमधील चिखलदारा तालुक्यातील सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तारुबंडा या गावी ‘कम्युनिटी हेल्थ अधिकारी’ म्हणून ते कार्यरत होते. २ मेपासून ते कर्तव्यावर नव्हते, अशी माहिती अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले यांनी दिली. रजेवर अकोल्यात दाखल झाल्यानंतर त्यांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. त्यांना २७ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना इतरही त्रास होता, अशी माहिती वैद्याकीय सूत्रांनी दिली. उपचारादरम्यान शनिवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात त्यांचे निधन झाले. बाळापूर येथील ५४ वर्षीय रुग्णाचाही शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २६ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अकोल्यातील एका करोनाबाधित महिला रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९ मे रोजी पाठविण्यात आले होते. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोगही होता. रविवारी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

आज सकाळच्या अहवालानुसार सकारात्मक आलेल्या ११ रुग्णांमध्ये सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. यामध्ये हरिहर पेठ येथील दोन, खदान, जी.व्ही. खदान, गायत्री नगर, गोडबोले प्लॉट, फिरदोस कॉलनी, जुने शहर, तारफैल, जठारपेठ व सिंधी कॅम्प येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ३५ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहे. मृत्यू व वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील चिंताजनक स्थिती कायम आहे.

७४.३५ टक्के रुग्णांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यात एकूण ५८१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४३२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज सोडण्यात आलेल्या नऊ जणांचा समावेश आहे. त्यातील सात जण संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली, तर दोन जणांना घरी सोडण्यात आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७४.३५ टक्के आहे.

‘त्या’ मृत्यूची अद्याप नोंद नाही
अकोला येथून पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवलेल्या करोनाबाधित महिलेचा रविवारी मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यू नागपूर येथे झाला असला तरी त्यांची करोनामुळे मृत्यूची नोंद अकोला जिल्ह्यातच होईल. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यू ३३ झाले. त्यांच्या मृत्यूची माहिती दूरध्वनीवरून देण्यात आली. अधिकृत माहिती न आल्याने ‘त्या’ मृत्यूची नोंद जिल्ह्याच्या दफ्तरी रविवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती. ती सोमवारच्या अहवालात होईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.