पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांच्या काही जुन्या ट्रिटमेंट सुरु असतील त्यांच्यासाठी कुठलीही रुग्णालयं पूर्णपणे सुरु रहायला हवीत, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रातील डॉक्टरांना आवाहन करतो की त्यांनी घाबरुन जाऊ नये. सरकार म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे, ते आम्ही करतोय. राज्यात पीपीई किटचा तुटवडा आहे. त्यासाठी ज्यांच्याकडून या किटचा पुरवठा होईल त्यांच्याकडून आपण ते घेत आहोत. केंद्र शासनाकडूनही याचा पुरवठा होत आहे.”

“खासगी दवाखाने, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरांशी मी काल स्वतः बोललो, त्याचबरोबर आपले आरोग्य अधिकारी देखील त्यांच्याशी बोलले. यावेळी या डॉक्टरांनी आश्वसनं दिलं की, जे नॉन कोव्हिड रुग्ण आहेत. म्हणजेच ज्यांच्या जुन्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही रुग्णालये कोणत्याही परिस्थितीत चालू राहिली पाहिजेत. नाहीतर करोना करोना करताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये,” अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

सर्दी, खोकला, ताप असे कोणतेही लक्षण लपवू नका

सर्दी खोकला, ताप यांसारखे आजार लपवू नका. कोणी आपल्याला वाळीत टाकण्याची भीती बाळगू नका. यांसाठी आपण दवाखाने सुरु केले आहेत. त्यामुळे घरीच उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या. कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्धही यातून बरे होत आहेत, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

मध्यम, अतिगंभीर करोनाच्या रुग्णांना वाचवण्याचे लक्ष्य

राज्यात जे ३,६०० लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांपैकी ५२ रुग्ण हे मध्यम ते अतिगंभीर प्रकारातील आहेत. सध्या त्यांना वाचवण्याचं लक्ष्य शासनासमोर आहे. कारण, असे काही आजार असलेले आणि त्यांना करोनाची बाधा झालेले रुग्ण शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे आपण काहीच करु शकत नाही, बऱ्याच जणांच्या चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.