वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जपावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. चांदवड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन आणि वैद्यकीय शिबिराप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आ. डॉ. राहुल आहेर, जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते. ट्रामा केअर सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आणि महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना तत्काळ वैद्यकीय सहायता मिळणे शक्य होणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्याच्या भावनेतून रुग्णसेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. बारा वर्षांच्या मूक-बधिर मुलांवर उपचार करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. अशा शिबिराचा लाभ गरीब आणि गरजूंना व्हावा, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली. शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यविषयक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच मालेगाव येथेदेखील अशाच स्वरूपाच्या शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. डॉ. लहाने यांनी नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला. जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवताना आहार, विश्रांती, व्यायाम याबाबतही नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. नियंत्रित व जीवनसत्त्वयुक्त आहारामुळे आरोग्य चांगले ठेवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आयोजित वैद्यकीय शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले.