News Flash

करोना रुग्णांना बाहेरुन औषध सांगणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करा-आदिती तटकरे

आर्थिक सहाय्य कमी पडू दिले जाणार नाही आदिती तटकरे यांची माहिती

लोकसत्ता, खास प्रतिनिधी

करोना रूग्णांना देण्यासाठी सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. असे असतांना जर शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगितले जात असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. अशा डॉक्टरांवर चौकशी करून बडतर्फीची कारवाई करा असे निर्देश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना दिलेत. त्याच बरोबर काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल होण्यास सांगत असल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारींची चौकशी करून संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा असे निर्देशही त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.

शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी पालकमंत्री आदिती तटकरे आलिबागला आल्या होत्या. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांना चांगले उपाचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात १२०० ऑक्सिजन खाटा आहेत. त्यात आणखी २०० खाटांची भर पाडणार आहे. ३१९ आयसीयू खाटा  आहेत. व्हेंटिलेटर्स पुरेसे आहेत. रूग्णांना बेड्स कमी पडू दिले जाणार नाहीत. ग्रामीण भागातील रूग्णांना प्रथमिक आरोग्यकेंद्रातच उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड कॉनर्स सुरू करण्यात येणार आहेत. तिथे कमी लक्षणे असलेल्या किमान तीन रूग्णांवर उपचार केले जातील अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी आर्थिक सहाय्य कमी पडू दिले जाणार नाही,  अशी माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात ४० हजार करोना रूग्ण आहेत. त्यातील ६० टक्के रूग्ण घरीच उपाचार घेत आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. रूग्णंचा मृत्यूदर देखील कमी आहे. मृत्यूदर आणखी कमी करणे यावर आमचा भर आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. माझे घर माझे कुटुंब या मोहिमेला रायगड जिल्ह्यात देखील सुरवात  झाली आहे. यासाठी १५०० आरोग्य पथक तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी असतील. त्यात आरेग्यसेवक, शिक्षक, आशा कर्मचारी, आरोग्यसेविका यांचा देखील समावेश आहे. ही पथक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. तसेच आरोग्याची महिती घेणार आहेत.

प्रत्येक दिवशी तालुक्यातील किमान २५० लोकांची तपासणी ही  पथके करणार आहेत. त्यामुळे रूग्णांची माहिती मिळेल. त्यांच्यावर योग्यवेळी उपचार केले जातील. मृत्यूदर रोखण्यास मदत होईल. या मोहिमेस रायगड जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 11:15 pm

Web Title: doctors who prescribes medicines to corona patients from outside suspend them says aditi tatkare scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “इंदू मिलची जागा मोदींमुळेच मिळाली, पायाभरणी कार्यक्रम लपूनछपून का?”
2 महिलेची अश्लील चित्रफीत बनवून २० लाख उकळले
3 “पालघर जिल्ह्याचा मृत्यूदर खाली आणण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवणार”
Just Now!
X