येथील ऐतिहासिक भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुयाराचे लघुपटाद्वारे अनोखे दर्शन घडवणारा लघुपट मुंबईच्या आशय सहस्रबुद्धे या विद्यार्थ्यांने तयार केला असून या विषयावरील देशातील ही बहुधा पहिलीच लघुपटनिर्मिती आहे.
इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या विषयामध्ये पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आशयने या भुयारावर लघुपट बनवण्याचे ठरवले आणि येथील रत्नदुर्ग माऊंटेनीअर्स या कोकणातील गड-दुर्गावर साहसी भटकंती करणाऱ्या चमूच्या सहकार्याने तशी निर्मितीही केली. चित्रीकरणाच्या सर्व साहित्यासह भुयारात उतरून तेथील अंतर्रचनेचे धावते वर्णन करत आशय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या भुयाराची तपशीलवार माहिती दृक्श्राव्य माध्यमाद्वारे यशस्वीपणे संकलित केली आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर प्रेक्षकांनाही या भुयाराचा साहसी प्रवास घडतो. भुयारातील दाट काळोख, खडक किंवा कातळ, लोंबकळणारी वटवाघळं, पाण्याशी घर्षणातून तयार झालेले वेगवेगळ्या आकाराचे दगड किंवा खडे इत्यादी विविध प्रकार या प्रवासात बघायला मिळतात.
सुमारे तीनशे फूट लांबीच्या या भुयाराची अंतर्रचना कमी-जास्त उंचीची असून काही ठिकाणी चक्क सरपटत, तर काही ठिकाणी व्यवस्थित उभं राहून आणि अखेरच्या टप्प्यात थंडगार गोडय़ा पाण्यातून वाट काढत आशयच्या कॅमेऱ्याबरोबरचा हा प्रवास खरोखर अनुभवण्यासारखा आहे.
अर्धा तास लांबीचा हा लघुपट प्रत्यक्ष अंतर्भागातील चित्रण, त्याबाबतचे थेट निवेदन आणि या विषयावरील तज्ज्ञांच्या भाष्याच्या तुकडय़ामुळे माहितीपूर्ण व रंजक झाला आहे. या साहसी निर्मितीसाठी ‘रत्नदुर्ग’चे संजय खामकर, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन आणि साहाय्य लाभल्याचे आशयने नमूद केले.
कन्याकुमारीमध्ये येत्या डिसेंबरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात हा लघुपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या दुर्लक्षित भुयाराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकवर्ग लाभणार आहे.