25 September 2020

News Flash

“देवाचा कुठला एक दिवस असतो का?”; ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आरोग्यमंत्र्यांचं भावनिक पत्र

डॉक्टरांना शुभेच्छा देताना आरोग्यमंत्र्यांनी लिहिलं एक भावनिक पत्र, कार्याचा केला गौरव

संग्रहित छायाचित्र

सध्याच्या करोना महामारीच्या काळात अनेकांना जीवनदान देण्यासाठी अविरत काम करणारे डॉक्टर्स लोकांसाठी जणू देव बनले आहेत. त्यामुळेच करोनाच्या काळातील नियोजन पाहणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजच्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्त जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. डॉक्टरांना शुभेच्छा देताना त्यांनी एक भावनिक पत्र लिहिलं असून यातून डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला आहे. “देवाला कुठला एक दिवस असतो का?” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून करोना विषाणूशी सर्वात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांसाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात टोपे म्हणतात, “डॉक्टरांसाठी कुठला एक दिवस असू नये, कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोजच आपल्यात हवा असतो. सध्या सर्वत्र धार्मिक स्थळं बंद आहेत. मात्र, त्यातील देव कुठे असेल तर डॉक्टर तुमच्या रुपाने तो सर्वांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे.”

आणखी वाचा- डॉक्टर्स डे स्पेशल : आधी करोनाबाधितांची सेवा, मग कौटुंबिक जबाबदारी

“आपली जबाबदारी मोठी आहे. कारण, करोनाचा आजार झाल्याच्या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांवर उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देण्याचं काम तुम्ही करीत आहात. करोनाची बाधा झाल्याच्या भीतीतून सध्या माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण झाली आहे. आपण मात्र, करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ आजारातून बरे करीत नाहीत, तर मानसिक पाठबळ देऊन त्यांना उभं करीत आहात, तुमची ही मानवसेवा अमुल्य आहे.”, असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात लिहिलं आहे.

आणखी वाचा- डॉक्टर्स डे : ‘त्या’ दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळालं : डॉ. संजीव वावरे

“आज राज्यात दीड लाख करोनाबाधितांपैकी ९० हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. आपली कर्तव्य भावना जागृत ठेऊन करोनाशी लढायला आपण दररोज घराबाहेर पडता. तसेच आम्ही तुमची काळजी घेऊ पण तुम्ही घरीच सुरक्षित थांबा असा प्रेमाचा सल्ला देणाऱ्या तुम्हा डॉक्टरांच्या कार्याला सलाम!,” अशा शब्दांत आरोग्यमंत्री टोपे यांनी डॉक्टरांना शुभेच्छा देताना जनतेच्यावतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 1:57 pm

Web Title: does god have a day emotional letter from the health minister on the occasion of doctors day aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… सोनाली कुलकर्णी झाली भावूक
2 चंद्रपूर : खासगी सुरक्षा रक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
3 होतकरूंसाठी ‘ते’ ठरले खाकी वर्दीतील देवदूत
Just Now!
X