गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषासह ढोल, लेझीम आणि बेंजो, झांज पथकाच्या निनादात सोमवारी सांगली-मिरजेसह जिल्ह्यात उत्साही स्वागत करण्यात आले. घरगुती गणेशाचे स्वागत झाल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका मोठय़ा उत्साहात सुरू झाल्या. प्रशासनाच्या साम, दाम, दंड आणि भेद या उपचारामुळे यंदा प्रथमच डॉल्बीमुक्त स्वागत मिरवणुका पाहण्यास मिळाल्या.

आज सकाळपासूनच गणेश आगमनाची घरोघरी लगबग सुरू होती. गणेशाचे आगमन झाल्याबरोबरच घरोघरी रांगोळी काढून श्रींचे घरच्या लक्ष्मीने भाकरतुकडा ओवाळून स्वागत केल्याचे चित्र दिसत होते. दुपापर्यंत घरगुती गणेशाची स्थापना करण्यात कार्यकत्रे गुंतले होते. दुपारनंतर मात्र सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी मिरवणुकांना प्रारंभ झाला.

सांगली शहरात जिल्हा बँकेच्या समोर असलेला ५०० मीटरचा मार्ग गणेशमूर्ती विक्रीसाठी आरक्षित करून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. या ठिकाणी असलेल्या मूर्तिकाराकडे ६ इंचापासून ७ फुटापर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यंदा मजुरीच्या दरात झालेल्या वाढीमुळे मूर्तीच्या किमतीमध्ये २० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मिरज शहरात सराफ कट्टा, ब्राह्मणपुरी, मालगाव रोड आदी ठिकाणी मूर्ती विक्रीची व्यवस्था करण्यात आली होती. मोठय़ा आकाराच्या गणेशमूर्ती थेट ट्रॅक्टरमधून कार्यशाळेतूनच नेण्यात येत होत्या. गणेशाबरोबरच चिखलाच्या गणोबालाही मागणी असल्याने याही मूर्ती मिरजेतील लक्ष्मी मार्केट, सांगलीतील दत्त-मारुती रस्ता आदी ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होत्या. याशिवाय दूर्वा, आघाडा, गणेशाला प्रिय असलेली जास्वंदी आणि कमळाची फुलेही विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात आली होती. स्वागत मिरवणुकीत यंदा दणदणाट मात्र जाणवला नाही. पोलिसांच्या सातत्याने प्रबोधनामुळे प्रसंगी कठोर कारवाईच्या इशाऱ्यामुळे स्वागत मिरवणुकीतून डॉल्बीचा दणदणाट गायब झाला असून कार्यकर्त्यांनी बेंजो, ब्रास बँड पथक, लेझीम, झांज पथकाला प्राधान्य दिले आहे. याशिवाय स्वागत मिरवणुकीवेळी होणारी फटाक्यांची आतषबाजीही कमी झाली आहे.