महापालिकेतील काँग्रेसच्या सत्तेला स्वाभिमानी आघाडीच्या सहकार्याने सुरुंग लावण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न मंगळवारी धुळीस मिळवित एका प्रभाग समितीचे सभापतिपद ‘स्वाभिमानी’ला तर उर्वरीत तीन समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. चारही प्रभागाच्या सभापतिपदी महिलांची निवड करण्यात आली. सभापती निवडीच्या निमित्ताने स्वाभिमानीतील मतभेद चव्हाटय़ावर आले.
प्रभाग एकसाठी काँग्रेसने शकुंतला खोत यांना संधी दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने सुनील कलगुटगी यांना उभे केले होते. या समितीत काँग्रेसचे ९ सदस्य आहेत, तर राष्ट्रवादीचे ५ आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे ३ सदस्य आहेत. श्रीमती खोत या विजयी झाल्या. खरी चुरस प्रभाग दोनसाठी होती. या ठिकाणी राष्ट्रवादीने स्वाभिमानी आघाडीतील स्वरदा केळकर यांना पािठबा देत राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच पकी ३ सदस्यांनी काँग्रेसच्या श्रीमती भोसले यांना पािठबा दिल्याने त्या विजयी झाल्या. प्रभाग ३ मध्ये श्रीमती संगीता खोत या स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारास काँग्रेस सदस्यांनी पािठबा देत प्रभाग दोनचा परा फेडला. प्रभाग ४ साठी मालन हुलवान यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली. त्यांनी अल्लाउद्दीन काझी यांना पराभूत करीत विजय संपादन केला.
प्रभाग सभापती निवडीत स्वाभिमानी विकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. आघाडीतील भाजपाचे सदस्य राष्ट्रवादीसोबत आणि माजी आ. संभाजी पवार यांचा गट काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र राष्ट्रवादीने प्रभाग २ वगळता अन्य तीन ठिकाणी आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना केळकर म्हणाल्या की, आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केला असून यामुळे त्यांचे सत्ताधारी काँग्रेससोबत असलेले मधूर संबंध उघडकीस आले आहेत. यापुढील काळात सत्ताधारी गटाला गरकृत्य करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीला मुद्दय़ाच्या आधारावर पािठबा राहील. स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज म्हणाले की, आम्हाला समिती सोडत असताना राष्ट्रवादीने विशिष्ट उमेदवाराचा आग्रह धरणे चुकीचे होते.