12 July 2020

News Flash

१६ जागांसह ‘जनसेवा’चे वर्चस्व अबाधित

एका जागेवर पुन्हा संजय चोपडा!

शहरातील व्यापारी वर्तुळाचे लक्ष लागलेल्या अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक संचालक हस्तिमल मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकत बँकेवरील निर्विवाद वर्चस्व यंदाही अबाधित ठेवले. मात्र सभासदांनी यंदाही एकमेव अपक्ष उमेदवार संजय चोपडा यांना विजयी करत बँकेतील मुनोत यांच्या विरोधातील आवाजही जिवंत ठेवला. नगर अर्बन, शहर सहकारी बँकेपाठोपाठ सभासदांनी मर्चंट्स बँकेचीही सूत्रे विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या हाती ठेवण्याचा कौल दिला आहे. अर्थात मर्चंट्स बँकेची निवडणूक मुनोत यांच्यासाठी एकतर्फीच होती.
मर्चंट्स बँकेसाठी रविवारी सुमारे ८० टक्के मतदान झाले. सोमवारी टिळक रस्त्यावरील पटेल मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे व सहायक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली. निकाल स्पष्ट होताच जनसेवाचे उमेदवार व चोपडा यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत व ढोलताशे वाजवत जल्लोष साजरा केला. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी २ वाजता संपली.
सर्वाधिक मते सुभाष भांड (४८३९), त्याखालोखाल मीनाताई मुनोत (४६५१) तर सर्वसाधारणमध्ये सर्वाधिक मते हस्तिमल मुनोत (४०९७) यांना मिळाली. चोपडा दहाव्या क्रमांकावर विजयी झाले. आणखी एक अपक्ष उमेदवार हेमेंद्र रमेश कासवा यांनी चांगली मते (२३८८) मिळवली, मात्र त्यांची लढत अपुरी ठरली. चोपडांच्या विरोधात ऐनवेळी जनसेवाची त्यांना मदत मिळाल्याची चर्चा होत होती. जनसेवाचे एकमेव उमेदवार नरेंद्र नेमीचंद लोहाडे (२२४५) पराभूत झाले. विजयी उमेदवारांत तीनच नवे चेहरे आहेत.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण- हस्तिमल मुनोत ४०९७, आनंदराम मुनोत ४०३०, किशोर गांधी ३७१४, अजय मुथा ३६६९, अनिलकुमार पोखरणा ३६६३, आदेश चंगेडिया ३६३५, संजय बोरा ३६९३, मोहनलाल बरमेचा ३५४४, कमलेश भंडारी ३५००, अमित मुथा ३१९४, संजीव गांधी २९५५ (सर्व जनसेवा) व अपक्ष संजय चोपडा ३२५३. महिला- मीनाताई मुनोत ४६५१, प्रमिला बोरा ४१६८. विशेष मागास प्रवर्ग- सुभाष भांड ४९३९. जनसेवा मंडळाचे विजय कोथिंबिरे व सुभाष बायड यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण- हेमेंद्र कासवा २३८८, नरेंद्र लोहाडे २२४५ (जनसेवा), संपतलाल मुथियान १८१५, संतोष गांधी १७९४, प्रमोद गांधी ९८९,बद्रिनरायण राठी ३३९. महिला- संगीता सुधीर मुनोत १२६७. विशेष मागास प्रवर्ग- संजय डापसे ३५६.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2015 2:50 am

Web Title: dominance of janseva with 16 seats
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे!
2 मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस पलटी ;१६ जण जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक
3 ‘दुष्काळाची समस्या मुख्यमंत्री अन् पंतप्रधानांना कळविणार!
Just Now!
X