कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या गेलेल्या श्री. छ. राजाराम सह. साखर कारखान्याच्या पंचवार्षकि निवडणुकीत सोमवारी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना धोबीपछाड केली. चुरशीच्या निवडणुकीत महाडिक आघाडीने विजय मिळविला असला तरी नाममात्र मताधिक्य राहिल्याने या गटाला हा धक्का बसल्याचेही मानले जात आहे. आमदार अमल महाडिक यांनी विजय मिळविल्याने सहकार क्षेत्रातील आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय वारसाचा उदय या निवडणुकीत झाला. या निकालाने महाडिकांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शहरालगत असलेल्या कसबा बावडा येथील राजाराम सह. साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी महाडिक व पाटील या दोघांनी चांगलीच कंबर कसली होती. आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली होती. एकीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत या दोघात कडवा मुकाबला सुरू असताना त्याची आणखी एक झलक राजारामच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील नागरिकांना पाहायला मिळाली होती. रविवारी चुरशीने मतदान होऊन विक्रमी ९० टक्के मतदान झाले होते. मतदानातील चढाओढ पाहता निकाल कसा लागणार याचे कुतूहल सर्वानाच होते.
सोमवारी सर्वप्रथम सहकारी संस्था गटातील मतमोजणी पार पडली. यामध्ये आमदार महाडिक यांनी ९२ मते घेऊन विजय मिळविला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सखाराम चव्हाण यांना ३४ मते मिळाली. यानंतर ऊस उत्पादक गटातील मतमोजणी सुरू राहिली. शिरोली या गटात कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना जोरदार विरोध असल्याचे प्रचार काळात दिसत होते. तथापि या गटात पाटील यांनी बाजी मारली. आमदार महाडिक यांनी राजकीय क्षेत्रात आपला वारस या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आणला असून आमदार अमल महाडिक हेही या निवडणुकीत विजयी झाले. प्रत्येक फेरीनिहाय महाडिक गटाचे उमेदवार विजयी होत राहिले. यामुळे सतेज पाटील गटात चिंतेचे वातावरण पसरले तर महाडिक गटात जल्लोष सुरू होता. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण कार्यकर्त्यांकडून केली जात होती. महाडिक गटाने राजाराम कारखान्यावर वर्चस्व मिळविले असले तरी घटलेले मताधिक्य त्यांना चिंतन करण्यास भाग पाडणारे होते.