06 July 2020

News Flash

मराठवाडय़ाला शिवसेनेचा ठेंगा!

नव्या युती सरकारमध्ये शिवसेनेने मराठवाडय़ाला ठेंगाच दाखवला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाडय़ातून एकाही शिवसेना आमदाराचा विचार झाला नाही.

| December 6, 2014 01:10 am

नव्या युती सरकारमध्ये शिवसेनेने मराठवाडय़ाला ठेंगाच दाखवला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाडय़ातून एकाही शिवसेना आमदाराचा विचार झाला नाही. जालन्यातून अर्जुन खोतकर, वसमतमधून जयप्रकाश मुंदडा, लोहा येथील प्रताप पाटील चिखलीकर व औरंगाबादचे संजय शिरसाट या सर्वाना लाल दिवा मिळू शकतो, असे वाटत होते.
१९८६पासून मराठवाडय़ात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकांमध्ये यशही मिळते. मात्र, सत्तासोपानात प्रतिनिधित्व देताना डावलण्यात आल्याची भावना शिवसेनेत आहे. आणखी दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. तेथे वर्णी लागू शकते, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६३ आमदारांसह पाहणी दौरा केला. त्यानंतर सत्तासोपानातील वाटय़ाची चर्चा सुरू झाली. एका अर्थाने दुष्काळासारखा संवेदनशील विषयही दबावतंत्राचा भाग म्हणून उपयोगात आणला गेला, अशी निरीक्षणे राजकीय विश्लेषक नोंदवू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेना मराठवाडय़ातील आमदारांना न्याय देईल, असे वाटले होते.
भाजपने जालना जिल्हय़ातील परतूरचे आमदार बबन लोणीकर यांना कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ दिली. याच जिल्हय़ातून अर्जुन खोतकर इच्छुक होते. ते या वेळी चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. या पाश्र्वभूमीवर खोतकर यांची वर्णी लागू शकेल, अशी चर्चा होती. याबरोबरच हिंगोली जिल्हय़ातील वसमतचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनाही डावलले. मागील युती सरकारमध्ये मुंदडा सहकारमंत्री होते. लोहय़ाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरही लढवय्ये म्हणून ओळखले जातात. त्यांचाही पत्ता कटला. नांदेड जिल्हय़ात अधिक जागा येऊनही या जिल्हय़ासही मंत्रिपद मिळाले नाही.
वर्षांनुवर्षे मंत्रिमंडळात कोणी न कोणी लातूर जिल्हय़ाचे असायचेच. या विस्तारात भाजपने लातूर जिल्हय़ाला डावलले. या जिल्हय़ातून संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव चर्चेत होते. मराठवाडय़ातून शिवसेनेचे ११, तर विदर्भातून तर केवळ ४ आमदार निवडून आले आहेत. मात्र, विदर्भातील संजय राठोड यांना संधी मिळाली आणि मराठवाडय़ाच्या वाटय़ाला ठेंगाच मिळाला. शिवसेनेचे वरिष्ठ नेते यावर बोलण्यास तयार नाहीत. पक्षनेतृत्वाचा निर्णय आहे. पुढे संधी मिळू शकेल, एवढेच ते सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2014 1:10 am

Web Title: domineering of shivsena to marathwada
Next Stories
1 जवखेडे हत्याकांड कौटुंबिक वादातूनच
2 २५० गावांचे वाळवंट?
3 पानी कम बीअर!
Just Now!
X