शरद पवार यांचे आवाहन

कराड : जगात शेतीमध्ये आलेल्या नवतंत्रज्ञानातून आमूलाग्र बदल करून उत्पादन वाढीबरोबरच शेतमालाला अधिक किंमत कशी मिळेल यासाठी तरूण पिढीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.

कराडनजीकच्या यशवंतनगर येथे सह्यद्री सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम शुभारंभ तसेच, सह्यद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ज्येष्ठनेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सह्यद्री कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मोहनराव कदम, अरूण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, प्रभाकर देशमुख आदींची उपस्थिती होती.

पवार म्हणाले, की देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. तेव्हा ८० टक्के  लोक शेती करत होते. आज देशाची लोकसंख्या चौपट झाली असताना मात्र, शेतीक्षेत्र घटत चालले आहे. या जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी होऊ लागला आहे. शेतकरी कुटुंबातील एका मुलाने शेती करावी व इतरांनी उद्योग अथवा अन्य क्षेत्रात काम करावे.

आज प्रगत शेतीशिवाय पर्याय नाही, नवे संशोधन, तंत्रज्ञान वापरून उत्पादकता वाढवणे व शेतमालाची योग्य किंमत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन निर्मिती करण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉल, वीजनिर्मितीसारखी उत्पादने घेणे काळाची गरज बनली असल्याचे पवार यांनी सांगितले.  सह्यद्री साखर कारखान्याने आत्तापर्यंत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पी. डी. पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी दूरदृष्टीने कारखाना प्रगतीपथावर नेला. आज ऊसशेती ही आळशी शेतकऱ्यांची शेती झाली आहे. यापुढे मात्र, केवळ उसावर अवलंबून न राहता अन्य पिकांकडे वळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी जगाचे ज्ञान घ्यावे. मुंबई, दिल्लीच्या घडामोडीही जाणून घ्याव्यात. पण, त्यापेक्षाही शेतीकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तुमच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. परंतु, तुम्ही काळजी करू नका मुंबईतील काम मी नीटनेटके करीन आणि त्यामध्ये मला यशही मिळेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांचीही भाषण झाली.