अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जोरात तयारी सुरू आहे. या कामावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उपरोधिक कौतूक केलं आहे. “ट्रम्प यांच्या नजरेतून गुजरातची गरिबी, झोपडय़ा सुटाव्यात यासाठी ही ‘राष्ट्रीय योजना’ हाती घेतल्याची टीका सुरू आहे. ट्रम्प यांना देशाची दुसरी बाजू दिसू नये यासाठी काय हा खटाटोप? प्रश्न इतकाच आहे, मोदी हे सगळ्यात मोठे ‘विकासपुरुष’ आहेत. त्यांच्या आधी या देशात कोणी विकास केला नाही व बहुधा नंतरही कोणी करणार नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे ‘बादशहा’ हे येत्या आठवड्यात हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. त्यामुळे आपल्या देशात मोठीच लगीनघाई सुरू आहे. ‘बादशहा’ प्रे. ट्रम्प हे काय खातात, काय पितात, त्यांच्या गाद्या-गिरद्या, टेबल, खुर्च्या, त्यांचे बाथरूम, त्यांचे पलंग, छताची झुंबरे कशी असावीत यावर केंद्र सरकार बैठका, सल्लामसलती करीत असल्याचे दिसते. प्रे. ट्रम्प हे कोणी जगाचे ‘धर्मराज’ किंवा ‘मि. सत्यवादी’ नक्कीच नाहीत. ते एक अतिश्रीमंत उद्योगपती, भांडवलदार आहेत व आपल्याकडे ज्याप्रमाणे बडे उद्योगपती राजकारणात शिरतात किंवा राजकारण पैशांच्या जोरावर मुठीत ठेवतात त्याच विचारसरणीचे असे प्रे. ट्रम्प आहेत. ट्रम्प हे काही फार मोठे बुद्धिवादी, प्रशासक, जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत काय? नक्कीच नाहीत, पण सत्तेवर बसलेल्या माणसाकडे शहाणपणाची गंगोत्री आहे हे गृहीत धरूनच जगास व्यवहार करावे लागतात,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही बाबा! ‘मौका पडे तो गधे को भी बाप कहना पडता है’ ही जगाची रीत आहे. त्यामुळे अमेरिका बलाढ्यआहे व त्यांचा अध्यक्षही खुर्चीवर असेपर्यंत बलाढ्यच असतो. अशा या बलाढय़ अमेरिकेचे बलाढय़ राष्ट्राध्यक्ष हिंदुस्थान भेटीवर येत आहेत व त्याबद्दल खुद्द प्रे. ट्रम्प, त्यांच्या पत्नी उत्साहित आहेत. त्यांच्या स्वागताची हिंदुस्थानात किंवा प्रत्यक्ष दिल्लीत किती लगबग सुरू आहे ते माहीत नाही, पण मोदी-शहा यांच्या गुजरातमध्ये ट्रम्प यांचे आगमन सर्वप्रथम होत असल्याने तेथे मात्र मोठीच लगबग सुरू झाली आहे. त्या लगबगीस काही नतद्रष्टांनी आक्षेप घेतला आह़े प्रे. ट्रम्प यांना आधी गुजरातमध्येच का नेले जात आहे या प्रश्नाचे खरे उत्तर मिळणे कठीण आहे. आम्ही असे वाचतोय की, प्रे. ट्रम्प हे फक्त तीन तासांच्या भेटीवर येत आहेत व त्यासाठी शंभर कोटींवर खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. 17 रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे, नवे रस्ते बांधले जात आहेत, पण सगळय़ात गंमत अशी की, प्रे. ट्रम्प यांना अहमदाबादच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या बकाल गरीबांच्या झोपडय़ांचे दर्शन होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘गडकोट’ किल्ल्यास तटबंदी असावी तशा भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. ट्रम्प यांच्या नजरेतून गुजरातची गरिबी, झोपडय़ा सुटाव्यात यासाठी ही ‘राष्ट्रीय योजना’ हाती घेतल्याची टीका सुरू आहे. ट्रम्प यांना देशाची दुसरी बाजू दिसू नये यासाठी काय हा खटाटोप? प्रश्न इतकाच आहे, मोदी हे सगळ्यात मोठे ‘विकासपुरुष’ आहेत. त्यांच्या आधी या देशात कोणी विकास केला नाही व बहुधा नंतरही कोणी करणार नाही,” असा टोला शिवसेनेनं मोदींना लगावला आहे.

‘फिट्टमफाट’ म्हणून ‘केम छो ट्रम्प’-

“मोदी हे पंधरा वर्षे गुजरात राज्याचे ‘बडा प्रधान’ व आता पाच वर्षे संपूर्ण देशाचे ‘बडा प्रधान’ असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपण लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी? असा प्रश्न अमेरिकेच्या प्रसिद्धीमाध्यमांतही विचारला जाऊ शकतो. मोदी यांचा जयजयकार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी अमेरिकेत ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रे. ट्रम्प यांनी हजेरी लावली होती. आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आली आहे व गुजरातमध्ये ‘फिट्टमफाट’ म्हणून ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही सरळ राजकीय योजना आहे. गुजरातचे अनेक लोक अमेरिकेत आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रे. ट्रम्प यांच्यासाठी ‘केम छो ट्रम्प’चा खेळ मांडला असला तरी त्यास राजकीय विरोध होऊ नये. प्रे. ट्रम्प हे हिंदुस्थानात पधारल्यामुळे रुपयाची घसरण थांबणार नाही व भिंतीपलीकडे गुदमरलेल्या गरीबांच्या जीवनात बहार येणार नाही,” या शब्दात शिवसेनेनं अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या कामांचा समाचार घेतला आहे.