News Flash

गाढव बाजाराला उतरती कळा!

केकाळी प्रसिद्ध असलेल्या या बाजाराला आता उतरती कळा लागली आहे.

donkey market
गाढव बाजार

नव्या तंत्रज्ञानाचा परिणाम बारा बलुतेदार व भटक्यांच्या जीवनशैलीवर व व्यवसायावर होऊ लागला असून, ओझी वाहण्यासाठी गाढवांची मागणी घटल्याने त्याचा थेट परिणाम मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) प्रसिद्ध असलेल्या गाढव बाजारावर झाला आहे. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या या बाजाराला आता उतरती कळा लागली आहे.

भटके विमुक्त, बारा बलुतेदारांची पंढरी म्हणजे मढी होय. तेथील यात्रा होळीला सुरू होऊन पाडव्याला संपते. वैदू, जोशी, गोपाळ,पारधी, वडार अशा अनेक भटक्या जाती-जमातींच्या जात पंचायती येथे भरत, न्याय निवाडे होत. १५ दिवसांच्या यात्रेला जोडून येथे शेकडो वर्षांपासून गाढवांचा बाजार भरतो. राज्यात जेजुरी, जुन्नर, माळेगाव, सोनारी येथे जरी गाढवांचा बाजार भरत असला तरी मढीचा बाजार सर्वात मोठा व प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून गाढवाचे व्यापारी गाढव विकायला घेऊन येथे येत असत. आता केवळ गुजरातची काठेवाडी गाढवेच विकायला येतात.

पूर्वी या बाजारात चार ते पाच हजार गाढवे विकायला येत असत. खरेदी-विक्रीला येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ही मोठी असायची. यात्रेला आलेले लोक गाढवांचा बाजार बघून जात. तो एक कुतूहलाचा विषय असे, भटक्यांचे त्यामागे धंद्याचे गणित असे. पण आता या बाजाराला उतरती कळा लागली आहे. आता केवळ ४०० ते ५०० गाढवे विकायला येतात. व्यापाऱ्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजावी एवढीच असते. दिवसेंदिवस हा बाजार कमी-कमी होत चालला आहे. नवे तंत्रज्ञान व जीवनशैली हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते.

पूर्वी वडार समाजातील लोक हे जाते, पाटे तयार करून ते गाढवावर टाकून गावोगाव विक्रीसाठी घेऊन जात होते. आता मिक्सर आले, गिरण्या आल्या. त्याने धंदा कमी झाला, घरांचे घडीव दगडाचे काम बंद झाले, गाढवांचा कामासाठी वापर थांबला. तेच डाले, टोपल्या तयार करून ते गाढवावर गावोगाव विक्रीला नेण्याचा कैकाडी समाजाचा धंदा बंद झाला. कुंभार समाज हा गाढवावर वाळू व माती वाहतुकीचे काम करीत असे, पण आता जेसीबी यंत्रे आली, वाहतुकीला मोटारी, लहान मालवाहू रिक्षा आल्या, वाळूचे ठेके दिले जाऊ लागले.

सरकारचे धोरण बदलले. त्यामुळे ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर जवळजवळ बंद झाला. रस्ते बांधणी, विटभट्टय़ांवर गाढवांचा वापर थांबला. त्यामुळे गाढवं पाळण्याचे प्रमाण आता कमी होत आहे.

आता जेथे गल्लीबोळ आहेत, दुसरी कोणती साधने जात नाहीत  तेथे ओझं वाहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. नद्याकाठी वाळू वाहण्याचा थोडाफार उद्योग चालतो. तेथेच आता त्यांचा वापर केला जातो. कुंभार समाज अजूनही गाढवाच्या लिदचा वापर माठ, गाडगी, मडकी व रांजण बनविण्यासाठी करतात. फ्रिज येऊनही माठातील पाणी अजूनही लोक पितात, त्यामुळे त्यांना मागणी आहे. या धंद्यात माती वाहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. तसेच आता तरुण पिढी पारंपरिक धंद्यात यायला तयार नाही. गाढवे हाकणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे आता केवळ वयस्कर लोकच या धंद्यात आहेत. नव्या जीवनशैलीत गाढव पालनाला स्थान राहिलेले नाही.

पूर्वी दिवसभर काम करून घेतले की गाढवे रात्री चरायला सोडून दिले जात असत. गावभर ते िहडत, पण आता गाढवे चोरीला जातात. त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. आंध्र व कर्नाटकात गाढवाचे मटण खाल्ले की लैंगिक शक्ती वाढते असा प्रचार सुरू आहे. तेथील काही तस्कर रात्री गाढवे चोरून नेतात. तस्कराच्या हाती गाढवं लागणार नाही, याची कायम दक्षता घ्यावी लागते.

मढीच्या गाढव बाजारात फेरफटका मारला असता कान्हू जाधव (शिरूर), सचिन मदारी, सुनील गायकवाड (नेवासे), प्रदीप गोरे (एरंडोल), अमोल घोडके (रुईछत्तीशी), कोंडिराम राऊत (भातोडी पारगाव) येथील विविध बारा बलुतेदारीच्या जुन्या व्यवसायात असलेल्यांनी हे अनुभवकथन केले.

मढीच्या बाजारात तीन ते ३५ हजारांपर्यंत गाढव विकले गेले. बाजारात गुजरातची काठेवाडी गाढवे विक्रीसाठी आली होती. ती देशी गाढवांपेक्षा देखणी व सशक्त होती. त्यांना किंमतही चांगली मिळाली. नदीतून वाळू काढून विक्री करण्यासाठी बहुतेक गाढवे खरेदी केली.

गाढव पालनाकडे पाठ

पूर्वी कुंभार, बेलदार, कैकाडी, वडार, धोबी, घिसाडी, परीट, सापवाले, गारुडी असे अनेक समाजातील लोक गाढव पाळत होते. आता ते कमी झाले असे कोंडिराम राऊत या वृध्दाने सांगितले. भटके व बारा बलूतेदारांची शाळा न शिकलेली मुलेच आता या धंद्यात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 1:41 am

Web Title: donkey market in maharashtra
Next Stories
1 सिंचन सुविधेवर बुलडोझर फिरवणारी ‘समृद्धी’!
2 जळगाव येथे अपघातात दोन ठार, चार जण जखमी
3 राज्यात मुद्रा योजनेची गती मंदावली
Just Now!
X