पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करावी, मंदिरातील सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तूंची मोजदाद करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आदी मागण्यांसाठी विश्व वारकरी सेनेच्या वतीने उद्या, शुक्रवारी पंढरपुरात अरुण बुरघाटे महाराज व त्यांचे सहकारी बेमुदत उपोषणास बसणार आहेत. पंढरपूर तहसील कार्यालयावर गाढव मोर्चाही नेण्यात येणार आहे.
संत मुक्ताबाई मठापासून गाढव मोर्चा निघणार असून, या मोर्चाचे नेतृत्व विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बुरघाटे महाराज हे करणार आहेत.
विठ्ठल मंदिर समितीचा कारभार पारदर्शक राहिलेला नाही. मनमानी वाढली आहे, त्यामुळे ही समिती शासनाने त्वरित बरखास्त करावी. विठ्ठल मंदिरात प्राचीन काळापासून जतन केलेल्या सोन्याचे दागिने, मोतीहार, रत्नहार व अन्य मौल्यवान वस्तू गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विठ्ठलाची होणारी बदनामी थांबवावी, यासाठीच आपण आंदोलन हाती घेतल्याचे बुरघाटे महाराज यांनी सांगितले.