आसाराम लोमटे

परभणीत अवैध वाळू वाहतुकीसाठी चक्क गर्दभांचा वापर

अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर अधूनमधून कारवायांतून वाचण्यासाठी परभणी जिल्हय़ातील सोनपेठ येथे गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यासाठी गाढवांचा उपयोग सर्रासपणे होत आहे. अशी वाळू वाहतूक करणारी २९ गाढवेही महसूल प्रशासनाने जप्त केली खरी, पण दुसऱ्या दिवशी त्यातील दहा गाढवे चोरीस गेली. त्यामुळे परभणी जिल्हय़ात महसूल प्रशासनातील गाढवपुराण सध्या चर्चेचा विषय आहे.

वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर मोठा दंड आकारला जातो, पण गाढवांवर तो कसा आकारायचा असा पेच महसूल प्रशासनासमोर आहे. त्यामुळे गाढवावर कारवाई होते खरी पण ती अर्थहीन ठरते, असे चित्र दिसून येत आहे.

परभणी जिल्हा प्रशासनाने कितीही कारवाया केल्या तरीही अवैध वाळू उपसा थांबत नाही हे स्पष्ट झाले आहे. वाळूमाफियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. वाहने जप्त होत आहेत म्हणून जिल्ह्य़ात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी चक्क गाढवांच्या मदतीने वाळू उपसा करण्याची शक्कल लढवली आहे. महसूल पथकाने खडका ते मोहळा दरम्यानच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल २९ गाढवांवर कारवाई करून ती जप्त केली. खडका येथील वीज उपकेंद्राच्या जागेत ही गाढवे बांधण्यात आली होती. पुढील सर्व कारवाई राहिलेली असताना आणि कारवाई करून एक दिवसही उलटत नाही. तोच यातील दहा गाढवे गायब झाली. संबंधित गाढवे खडका ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र आता चोरीला गेलेल्या गाढवांची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींने या प्रकरणी हात झटकले आहेत. महसूल पथकाने २९ गाढवे ग्रामपंचायतींच्या ताब्यात दिली. मात्र ग्रामपंचायतींकडे कोंडवाडा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने देखरेखीसाठी दोन व्यक्तीही नेमल्या. शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी दहा गाढव चोरून नेले, असे गावकऱ्यांनी सांगितले. चोरीची माहितीही आता तहसीलदारांना कळविण्यात आली आहे.

दंड नाही

  • वाहनांवर ज्या पद्धतीने भरमसाठ दंड आकारण्यात येतो तसा गाढवांवर आकारला जात नाही.
  • गाढवांच्या पाठीवर वाळूच्या गोण्या लादल्या जातात आणि अपेक्षित स्थळी साठा केला जातो.
  • दिवसभर गाढवांच्या अनेक खेपा होतात. यापूर्वी अनेकदा अशी गाढवे जप्त करण्यात आली आहेत. मात्र ती पुन्हा चोरीलाही जातात. त्यामुळे या कारवाया निर्थक ठरत आहेत.

सोनपेठ तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारी २९ गाढवे महसूल पथकाने ताब्यात घेतली. मात्र त्यातील दहा गाढवे चोरीला गेली आहेत. अवैध वाळू उपसा करण्यासाठी गाढवांचा वापर गोदापट्टय़ात केला जात आहे.

अर्निबध वाळू उपसा..

परभणी जिल्हय़ात विशेषत सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड हे तालुके वाळू उपशाबाबत आघाडीवर आहेत. वाहनांवर अनेकदा छापे घालण्याचा प्रयत्न होतो. मात्र,अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच वाळूमाफियांपर्यंत खबर जाते आणि ते पसार होतात. जिल्ह्य़ातून नांदेड तसेच लातूर जिल्ह्य़ातही वाळूचा पुरवठा होतो. आजवर महसूल प्रशासनाने अनेकदा वाहने पकडली, त्यांच्यावर कारवाया केल्या, कधी कधी वाळूचे साठे जप्त करण्यात आले. मात्र जप्त केलेले साठेही चोरीला जाण्याचे प्रकार घडले. यातून प्रशासनाचा महसूल मात्र बुडत आहे.