मराठवाडा व विदर्भात टंचाई स्थितीचे मोठे संकट आहे. टंचाई निवारणासाठी सरकारने विविध उपाययोजना आखल्या आहेत. टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित करू नये, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे नावीन्यपूर्ण प्रयोग हाती घ्यावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
जिल्ह्य़ातील टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्याच्या काही योजना बंद आहेत. या योजना सुरू करण्यात काही अडथळे निर्माण होत असल्यास ग्रामपातळीवर समिती नेमून व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी. तसेच दुष्काळी स्थितीत ज्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करण्यात आली असेल, त्या शेतकऱ्यांकडून वसूल केलेले पैसे परत करावेत व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दुष्काळी स्थिती निवारण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्षम काम करावे, अशी सूचना केली. वारंवार निर्माण होणाऱ्या टंचाई स्थितीमुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत विहिरी, शेततळी, भूसुधारणा, गावतलाव, नाला खोलीकरण आदी कामे घेण्याच्या सूचनाही लोणीकर यांनी केल्या. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीकविमा पॉलिसीबाबत मदत मिळवून देणे, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभाग, भूसंपादन विभाग, विद्युत विभाग आदी विभागांनी सतर्क राहून काम करावे, असेही सांगितले.
जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ात केलेल्या कामांचा आढावा व उपाययोजना आदींबाबत माहिती दिली. जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे आदी उपस्थित होते.