राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) २५ किल्ल्यांची यादी करण्यात आली असून हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आल्यापासून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका असा इशारा देतानाच जर उत्पन्नच हवे असेल तर
गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या अशा शब्दात राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

शनिवारी(दि.7) डोंबिवलीत बोलताना, “राज्यातल्या गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका कारण महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी व शिवप्रेमी हे कधीच सहन करणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला . पुढे बोलताना, “महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे. मात्र सरकारला याचं काही देणंघेणं नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनेबाबत त्यांना काही वाटत नाही. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत”, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर आसूड ओढला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या डोंबिवली दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी आज(दि.8) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शनिवारी दुपारी वाहतूककोंडीत अडकल्याने त्यांना ही बैठक रद्द करावी लागली होती.

दरम्यान, राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल’ असं स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी यापूर्वीच दिलं आहे.