करोना विषाणू संसर्ग काळात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सलून  तसेच ब्युटीपार्लर व्यवसाय पूर्णत: बंद आहे. परिणामी या व्यावसायिकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुर्गापूर येथे तर एका सलून चालकाने आत्महत्या केल्याचीही घटना घडली. ही बिकट परिस्थिती बघता खासगी इमारतीतील सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांवर भाडे वसूलीसाठी सक्ती नको, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

केंद्र व राज्य शासनाने सलून व ब्युटी पार्लर प्रतिष्ठानं सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र खासगी इमारतींमध्ये या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या इमारतीच्या मालकांना भाडे वसुलीची सक्ती न करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात आज एक व्हिडिओ संदेश चंद्रपूरवासीयांसाठी जारी केला आहे. यामध्ये जिल्ह्याातील व चंद्रपूर शहरातील ज्या खासगी इमारतीमध्ये सलून किंवा ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी आपले दुकान थाटले असेल, मात्र गेल्या काही दिवसात टाळेबंदी मुळे हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. तथापी, व्यवसाय बंद असल्यामुळे काही ठिकाणी भाडे थकीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर मालकांनी या काळात या व्यावसायिकांना भाडे देण्यासाठी तगादा लावू नये. तसेच, सक्ती करून त्यांना खोली रिकामी करण्यास सांगू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली आहे.

व्यवसाय सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भाडे वसुल करावे, असेही त्यांनी सुचविले आहे. तसेच या काळात कोणत्याही  इनडोअर किंवा मैदानी खेळाला मान्यता देण्यात आली नसून क्रीडांगणावर अशा पद्धतीच्या खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. सामूहिक व्यायाम करणे किंवा क्रीडांगणाच्या वापर करणे देखील चुकीचे असून याला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.