आनंदवनमधील वाद, तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुंबीयांनी स्वत: पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. ही संस्था टिकणे राज्य, देशाच्या हिताचे आहे, असेही त्यांनी नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

‘दुभंगलेले आनंदवन’ या शीषकाखाली ‘लोकसत्ता’ने नुकतीच वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यात सेवाभावाच्या उद्देशाने उभे राहिलेले आनंदवन आज कसे व्यावसायिक झाले आहे आणि हा बदल होत असताना संस्थेची मुख्य मूल्ये कशी पायदळी तुडवली जात आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला होता.

‘लोकसत्ता’च्या या वृत्तमालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचाच आधार घेत वडेट्टीवार यांनी आनंदवन व्यवस्थापनाला आवाहन केले. ते म्हणाले, ‘आनंदवन केवळ चंद्रपूर जिल्हय़ासाठीच नाही तर राज्य व देशासाठी पवित्रस्थळ आहे. त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत दुभंगणार नाही, याची काळजी आनंदवन कुटुंबाचे प्रमुख या नात्याने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे यांनी घ्यायला हवी.

आता आमटे कुटुंबाची पुढची पिढी सामाजिक सेवेचे हे व्रत सांभाळत आहे. ही संस्था उभारताना रक्ताचे पाणी केलेले संस्थेचे विश्वस्त आणि आता या संस्थेवर आयुष्य अवलंबून असलेले येथील निराधार व संस्थेचे कर्मचारी, अशा सर्वासाठी येथे वाद निर्माण होणे नुकसानकारक आहे’.

या संस्थेत हयात घालवणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या तक्रारीसुद्धा तेवढयाच महत्त्वाच्या आहेत. त्यांचीही दखल व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. ही संस्था फुलावी, बहरावी, मोठी व्हावी आणि पिढय़ान्पिढय़ा ती सुरू राहावी यातच सर्वाचे हित आहे. अशा वादातूनच अनेक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत.

त्याची पुनरावृत्ती आनंदवनात होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.