शाळा सुरू होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या पुढे विलगीकरणासाठी शाळा इमारती देवू नये व पोषण आहार योजना राबवण्या ऐवजी विद्यार्थांना शिधा घरीच नेवू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना तातडीची बाब म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे व प्रदेश कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी ईमेलद्वारे आज ही विनंती केली.
राज्यातील प्राथमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून तर विदर्भातील 26 जून पासून सुरू होते. कोवीड‑19 च्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळ्या भूमिका पूढे येत आहेत. त्याची दखल घेत शिक्षक समितीने काही मुद्दे आजच्या पत्रातून उपस्थित केले आहेत. करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आरोग्य विभागाचे मार्गदर्शन घ्यावे व नंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होवू नये ही बाब महत्वाची आहे. शाळेतील वर्ग खोल्यांची मर्यादा लक्षात घेवून शाळेची वेळ दोन भागात विभाजीत करावी. पटसंख्येच्या निम्मे विद्यार्थी दोन टप्यात शिकवावे, काही काळासाठी शाळा पाच दिवसच सुरू ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सध्या संस्थात्मक अलगीकरणासाठी प्रामुख्याने प्राथमिक शाळांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत, या पूढे अशा कामासाठी शाळा इमारतीचा उपयोग होवू नये. सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व इमारतींचे निर्जंतुकीकरण शासकीय कार्यालयाप्रमाणेच रोज करावे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी थर्मल गन उपलब्ध करून द्यावी. शाळांना मिळणारे अत्यल्प अनुदान लक्षात घेवून स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता ठेवण्यास लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शासनाने अग्रीम स्वरूपात निधी द्यावा. अध्यापनाखेरीज इतर सर्व उपक्रम बंद करावे. पोषण आहार योजनेतील दररोज शिजवून देण्याची पध्दत बंद करून महिन्याचे किंवा पंधरवाड्याचे धान्य शिधा स्वरूपात विद्यार्थांना घरी देण्याची व्यवस्था असावी, प्राप्त परिस्थितीत अभ्यासक्रम व अध्ययन पध्दतीत बदल करणे अपरिहार्य झाले आहे. दुर्गम व ग्रामीण भागात डिजीटल किंवा मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देणे अश्यक्य आहे. प्रचलित अध्यापन पध्दतीचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन असावे. राज्यातील अनेक शिक्षकांना करोना संबंधित सेवेत पाठविण्यात आले आहे. त्यांना शाळेत रूजू होण्यापूर्वी अलगीकरण आवश्यक असल्याने या सेवेतील सर्व शिक्षकांना तात्काळ मोकळे करावे. गणवेश योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी विद्यार्थांना गणवेश देणे शक्य नाही. बदलत्या परिस्थितीत शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये अशाही अन्य मागण्या आज करण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 8:54 pm