सध्या राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, त्याचे राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यातील दुष्काळी भागांचा  दौरा पूर्ण केल्यांनतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळाबाबत मत व्यक्त केले.
शरद पवार म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईची अवस्था बघून १९७२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. गेल्या पन्नास वर्षात अशी भीषण स्थिती मी पाहिली नाही.  पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करणे सरकारपुढील सर्वात कठीण आव्हान आहे. जिथे पाणी आहे, तेथील नागरिकांनी ते  जपून वापरले पाहिजे. पाण्याअभावी कारखाने बंद राहिले, तर जनावरांना चारा म्हणून ऊस वापरावा व सरकारने शेतक-यांना त्या ऊसाची भरपाई द्यावी. राज्यात आता फक्त १४ चारा छावण्या सुरू आहेत.  राज्यात चारा छावण्या उघडण्याची १०० ट्क्के जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. यंदाच्या दुष्काळात जनता होरपळून निघत आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केली आहे.
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील स्थिती त्यांच्या कानावर घातली जाईल, असेही पवार म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात टँकर चालू कऱण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते आता राज्य सरकारकडे असल्याने उपाययोजना राबविण्याबाबत विलंब होत आहे. याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.