करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता जनेतीश संवाद साधत मोठी घोषणा केली. पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. अन्नधान्य, किराणा माल, दुध यासारख्या अत्यावश्यक सेवांना यामधून सवलत देण्यात आली आहे. मात्र पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मुंबईच्या काही रस्त्यांवर किराणा मालाच्या दुकानांवर गर्दी पहायला मिळाली. या परिस्थितीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“संपूर्ण राज्यात अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी सर्व रेशन दुकानांना सध्याच्या घडीला योग्य प्रमाणात धान्य मिळेल याची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांनी धान्याची चिंता करु नये….जिवनावश्यक वस्तू तुम्हाला मिळत राहणार आहे. फक्त किराणा माल, रेशनच्या दुकानावर जात असताना गर्दी करणं टाळा…सोशल डिस्टन्स राखणं हे गरजेचं आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही.” राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं.

लॉकडाउनमध्ये काय सुरू राहणार? वाचा संपूर्ण यादी…

१) खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण

२) किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

३) प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया

४) टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.

५) बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा

६) शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात

७) खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण

८) उपाहारगृहांमधून घरपोच सेवा

९) रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक

१०) टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

११) पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था