दिल्लीत आपचा विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

९ फेब्रुवारीला राज ठाकरेंनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकला अशी भूमिका घेत मुंबईत महामोर्चा आयोजित केला होता. या महामोर्चात राज ठाकरेंनी मोर्चाला उत्तर मोर्चानं दिलं आहे. आता यापुढे दगडाला उत्तर दगडाने आणि तलवारीला उत्तर तलवारीने दिलं जाईल असं वक्तव्य केलं होतं. मात्र राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं वक्तव्य आज शरद पवार यांनी केलं आहे.

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी काँग्रेसवरही भाष्य केलं ते म्हणाले या निवडणुकीत दोनच पक्षांची लढाई होती. लोकांनी तिसरा पर्याय स्वीकारलाच नाही. भाजपाच्या पराभवाची मालिका सुरु झाली आहे. ती आता थांबणार नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. ते भाजपावर टीका करत असतानाच त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं वक्तव्य केलं आहे.

राज्याच्या राजकारणावर ज्यांच्या वक्तव्यांमुळे परिणाम होऊ शकतात अशाच व्यक्तींचं बोलणं गांभीर्याने घ्यायचं असतं. काहींची भाषणं लोक बघायला येतात, काहींची ऐकायला येतात. अशा प्रकारच्या भाषणांची फारशी नोंद घ्यायची नसते असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.