आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजपा नाहीतर शिवसेनेत असायचा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढं शरद पवारांना भाजपात घेऊ नका असं म्हणत चिमटा काढला. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य केलं. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिलं नाही असं सांगताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून उघड तलवारी काढल्या होत्या, काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतरा असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. मुख्यमंत्र्यांनी मनातून आणि म्यानातून तलवारी काढल्या आहेत असंही ते यावेळी म्हणाले. शिवसेना भाजपा जनतेची शेवटची अपेक्षा असून आम्ही गेलो तर अंधार पसरेल असं सांगत सर्वसमान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सर्व्हे म्हणजे अंतिम नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही, आत्मविश्वास हाच माझा विश्वास आहे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्रात ४८ जागा आपल्याला कमी पडतील असं सांगताना सर्व जागा आपणच जिंकल्या पाहिजेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.