कुर्ल्याहून करमाळीला निघालेली आणि डबलडेकर डबे असलेली रेल्वे शुक्रवारी हद्दीच्या वादामुळे सुमारे एक तास रोहा स्थानकावर अडकून पडली. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी रोहा स्थानकावर पोहोचलेली ही रेल्वे ९ वाजून ४० मिनिटांनी पुढे मार्गस्थ झाली.
या गाडीचे सारथ्य करणाऱया मध्य रेल्वेच्या चालकाने रोह्याच्या पुढे गाडी घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे कोकण रेल्वे व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. आपल्यावर केवळ रोह्यापर्यंतच गाडी घेऊन जाण्याची जबाबदारी असल्याचे चालक बी. सी. सिंग यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी रोह्याच्या पुढे गाडी घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र, कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या चालकाने ही गाडी रत्नागिरीपर्यंत नेणे अपेक्षित होते. मात्र, सिंग यांनी गाडी पुढे घेऊन जाण्यास नकार दिल्यानंतर घाईगडबडीत कोकण रेल्वेकडून दुसरा चालक आणण्यात आला आणि त्याने ही गाडी पुढे नेली. मात्र, हद्दीच्या वादामुळे या गाडीतून प्रवास करणाऱया प्रवाशांना विनाकारण रोहा स्थानकावर अडकून पडावे लागले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने पहिल्यांदाच कोकणात डबलडेकर रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहिल्यांदाच ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून करमाळीकडे निघाली होती.