सेनगाव तालुक्यातील खुडज येथील गारपीटग्रस्तांना वाटप केलेल्या निधीत गरप्रकार झाले असून एकाच घरात वेगवेगळे गट क्रमांक टाकून एकाच व्यक्तीला दोन वेळा निधीवाटप केल्याचा आरोप शेतकरी विठ्ठल संपतराव टाले यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत केला आहे. तलाठय़ाने केलेल्या निधीवाटपाचा लेखाजोखाच मांडून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.
गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांना निधी वाटप करताना अनेक गैरप्रकार झाले. १९ जून रोजी दिलेल्या तक्रारीत एकाच शेतकऱ्याच्या नावे दोनदा निधी दिल्याचे दिसून आले आहे. विठ्ठल टाले यांनी केलेल्या तक्रारीनुसार यादीमधील ५३ क्रमांकावर गजानन टाले यांचे नाव आहे. ज्याचा गट क्रमांक २९१ व क्षेत्रफळ २.८९ एवढे दाखविण्यात आले आहे. त्यांच्या शेतात हरभरा १५ आर व गहू २० आर असल्याच्या नोंदी तलाठय़ाने घेतल्या. त्यांना नुकसानभरपाई म्हणून ४ हजार ५०० रुपये देण्यात आले. त्यांच्याच नावे भाग क्रमांक ३१३ मध्येसुद्धा मदत देण्यात आली. ही रक्कम ५ हजार २५० रुपये असल्याचे विठ्ठल टाले यांनी तक्रारीत नमूद केले आहे. एकाच व्यक्तीस २ गट वेगळे दाखवून ९ हजार ७५० रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला.
विश्वनाथ घोषीर यांचे नावही दोनदा दाखवून मदत देण्यात आली. तक्रार केलेल्या यादीत इतरही नावांचा समावेश असून ज्यामध्ये साहेबराव राहटे यांना ९ हजार, प्रमोद कडूजी टाले यांना ७ हजार ५००, राजू केशव टाले यांना १० हजार ५००, बाबुराव काशिराम टाले यांना १४ हजार २५०, इंदिराबाई राहटे यांना ४ हजार निधीचे वाटप केले असून एकाच नावाने दोन वेळा वेगळे गट नोंदवून बनावट याद्या सादर करून गैरव्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्या त्या गटात नाव नसणे, जमीनच चुकीचा नोंदविणे, पेरा चुकीचा पद्धतीने लिहिलेला असणे, असे अनेक गैरप्रकार तक्रारीत नमूद आहे. शामसुंदर विठ्ठलराव टाले, दिपाली टाले यांची नावे तक्रारकर्त्यांने नमूद केली आहे.