04 March 2021

News Flash

विक्रमगडमध्ये सूर्यफुलाच्या लागवडीत दुप्पट वाढ

खुल्या बाजारपेठेत सूर्यफुलाचे तेल १०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते.

 

तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

पालघर : जिल्ह्यातील विविध तालुक्यात स्ट्रॉबेरी, विविध वाणांची भातशेती, काळा भात, मोगरा लागवड, नावीन्यपूर्ण भाजीपाला लागवड अशा प्रयोगशील शेतीनंतर आता विक्रमगड तालुक्यात  सूर्यफूल लागवडीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.

विक्रमगड तालुक्यातील सुपीक जमिनीचा लाभ घेत शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासुन विक्रमगड तालुक्यात सूर्यफूल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड उन्हाळी हंगामात मोठया प्रमाणात सुरू केली आहे.  यंदा  सुमारे २० हेक्टर जमिनीवर सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षी सुमारे दहा हेक्टर क्षेत्रात सूर्यफुलाची लागवड करण्यात आली होती.    तालुक्यातील माण,ओंदे व इतर गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली आहे. लागवडीकरिता बियाणे, खत, मजुरी, ट्रॅक्टर यावर मर्यादित खर्च  तसेच पिकाला पाण्याची कमी आवश्यकता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात सूर्यफूल शेतीकडे वळत आहे.

सुुमारे दीड एकर जमिनीवर लागवड केलेल्या सूर्यफूल पिकापासून १५ डबे खाद्यतेल म्हणजेच सुमारे २२५ किलो खाद्यतेल मिळते असा अंदाज शेतकरी वर्तवितात. खुल्या बाजारपेठेत सूर्यफुलाचे तेल १०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते.   तीन महिन्यांच्या एक हंगामात शेतकरी चांगलेच उत्पन्न मिळवत आहेत. सूर्यफुल पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरू शकते. सूर्यफूल उत्पन्न घेऊन  चांगलाच फायदा झालेला आहे, अशी प्रतिक्रिया ओंदे येथील शेतकरी जयंत दिघे यांनी व्यक्त केली.

 बियांपासून तेल काढण्याची पद्धती

सूर्यफुलांच्या सुकलेल्या फुलांची तोडणी केली जाते. त्यानंतर त्यातील काळ्या बिया काढून त्या तेलाच्या घाण्यात (गिरणीत) गाळले जाते. तेल गाळल्यानंतर उरलेला चोथा जनावरांना पौष्टिक खाद्य किंवा खत म्हणून वापरले जाते.

अमेरिकन जातीचे सूर्यफुल

ओंदे येथील शेतकरी रंदेश शंकर गोविंद यांनी सूर्यफुलाची एक एकरमध्ये इंडो अमेरिकन या जातीच्या सूर्यफुलाची लागवड केली आहे. हे वाण कमी खर्चात मोठे उत्पन्न देणार असल्याचे गोविंद म्हणतात. एकट्या माण गावातच सुमारे ३ हेक्टरच्या आसपास सूर्यफूल लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या काळात शेतकरी वैविध्यपूर्ण प्रयोग करीत असल्याने जिल्हा कृषी क्रांतीकडे वळत असल्याचा आनंद आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग सदैव मदत करेल. येथील कृषी क्षेत्र सहकार क्षेत्राकडे वळवण्यासाठी माझे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. – सुशील चुरी, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि. प.पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:29 am

Web Title: double increase in sunflower cultivation in vikramgad akp 94
Next Stories
1 वाड्यातील विकासकामे बासनात
2 नवीन वीज मीटरची कमतरता
3 वसईतील ग्राहकाला ८० कोटींचे वीज देयक
Just Now!
X