गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-मिरज-लोंडा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार मंत्रिगटाची बुधवारी मंजुरी दिली. एकूण ४६७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गावर अजून एक ट्रॅक बसविण्यात येणार असून, त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रवाशांना होईल, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेल्वेच्या ज्या मार्गांवर तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. तेथील प्रकल्पांना प्राधान्यांना मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे-मिरज-लोंडा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सुमारे ३६२७ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले.
पुणे ते लोंडा या मार्गावर सध्या एकच ट्रॅक असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर अनेक बंधने येतात. त्याचबरोबर गाड्यांची गतीही मर्यादितच ठेवावी लागते. दोन ट्रॅक सुरू झाल्यावर या मार्गावरील रेल्वे अधिक वेगाने धावू शकतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.