मीटरमध्ये बिघाड झाल्याने वीजदेयक आणि बचतीचा तपशील गुलदस्त्यात

नीरज राऊत, पालघर

पालघर शहरांमधील रस्त्यांवर प्रकाश योजनेसाठी असलेल्या सोडियम वेपर दिव्यांऐवजी एलईडी प्रकारचे दिवे बदलण्यात आले. यामुळे शहरात सुमारे ४०० किलोवॅट ऊर्जेची बचत होत आहे. मात्र याचा नगरपरिषदेला येणाऱ्या वीजबिल, परिणामी वीज देयकांच्या रूपाने होणाऱ्या आर्थिक बचतीचा तपशील अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे आरोप होत आहेत.

पालघर नगरपरिषदेमध्ये सुमारे २५७५ सोडियम वेपर दिवे पूर्वी कार्यरत होते आणि त्यांना सरासरी ६२५ किलोवॅट इतकी ऊर्जा लागत होती. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने जून २०१८ मध्ये ऊर्जा संवर्धन धोरणाच्या अनुषंगाने पथदिवे बसवताना फक्त एलईडी पथदिवे बसवणे बंधनकारक केले. तसेच सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसवण्यासाठी राज्यशासनाने करारनामा केला.

ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसवताना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रारंभी कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागणार नव्हती. तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेशी करारनामा करून एलईडी बसवण्याचे काम टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक केले होते. त्या अनुषंगाने पालघरमध्ये १८ वॅटचे ६६, ३५ वॅटचे १८८४,  ७० वॅटचे ६३३ आणि ११० वॅटचे ९५३ एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे शहरातील पथदिव्यांच्या वीज पुरवठय़ाकरिता २१६ किलोवॅट इतकी ऊर्जा लागत असून सुमारे ४०० किलोवॅट इतक्या विजेची बचत होत आहे.

यासंदर्भात झालेल्या करारामध्ये विजेच्या होणाऱ्या बचतीच्या रकमेतून ईईएसएल या कंपनीला एलईडी दिवे लावणे तसेच त्यांची देखभाल करण्याच्या कामाचा मोबदला देण्यात येण्याचे करारनाम्यात उल्लेखीत आहे. मात्र पालघर नगरपरिषदेने दिवाबत्तीकरिता वीज बिलांचा भरणा करण्यासाठी असलेल्या अनेक मीटरमध्ये बिघाड झाल्याने पालघर नगरपरिषद क्षेत्रामध्ये दिवाबत्तीवर होणाऱ्या खर्चाचा तपशील तसेच एलईडी दिवे बसवल्यामुळे झालेल्या विजेच्या बचतीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

यासंदर्भात पालघर नगरपरिषदेच्या विद्युत अभियंता अंजूम मुलाणी यांच्याशी संपर्क साधला असता नगरपरिषद हद्दीमध्ये बसवण्यात आलेले एलईडी लाइट बसवण्यापूर्वी परीक्षण करण्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र हे पथदिवे प्रत्यक्षात बसविल्यानंतर क्षमतेप्रमाणे प्रकाश देतात का? त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा पालघर नगरपरिषदेकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पथदिवे यांना होणारा विद्युत पुरवठा यांची मीटरिंग करण्यासाठी असलेल्या विद्युत मीटरपैकी अनेक मीटर सदोष असल्याने त्यासंदर्भात महावितरण कार्यालयाची संपर्क साधून पाठपुरावा केला जात आहे. यामुळे अनेक नगरपरिषद क्षेत्रातील एलईडी पथदिवे बदलल्यामुळे नेमकी किती ऊर्जेची बचत झाली. याचा तपशील देणे कठीण असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पथदिव्यांच्या विद्युत वापराची नोंद करण्यासाठी असलेले काही मीटर सदोष असून ते बदलण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सहाय्यक अभियंता श्री कोल्हे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना

नवीन एलईडी दिवे सदोष असल्याचा दावा पालघर नगरपरिषदेत बसवण्यात आलेले एलईडी दिवे काही दिवसातच खराब होत असल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली असून शहरातील माहीम रोड, आदर्श नगर, राजकमल सोसायटी, दत्तनगर इत्यादी भागांमध्ये अनेकदा पथदिवे बंद पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगरपरिषदेने नेमलेल्या ठेकेदारांकडून दिवसाला जेमतेम पंचवीस ते तीस दिव्यांची दुरुस्ती होत असल्याने नादुरुस्त पथदिव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. याविषयी पालघर नगरपरिषदेशी संपर्क साधला असता बंद पडलेले पथदिवे ४८ तासांत बदलणे संबंधित ठेकेदाराशी केलेल्या कराराप्रमाणे अपेक्षित आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामी व देखरेख ठेवण्यासाठी ठेकेदाराने चार कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात येईल.

पालघर शहरात एलईडी दिव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात बिघाड होत असल्याचे दिसून येत असून त्याची दुरुस्ती योग्य कालावधीत होत नाही. या एलईडी दिव्यांमूळे नगरपरिषदेच्या बिलाच्या रक्कमेमध्ये किती फरक झाला याची माहिती जाहीर होणे अपेक्षित आहे.

– भावानंद संखे, गटनेता, भाजप