बुधवारी रात्री नांदगाव समुद्रकिनाऱ्यावर फणसाड अभयारण्यातील बिबटय़ा अन्नाच्या शोधार्थ आला असल्याचे गावकऱ्यांना समजले. तशी बिबटय़ाची वाळूतील पाऊले उमटलीत म्हणून ग्रामस्थानी वनखात्याच्या वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील व कर्मचाऱ्यांना कल्पना दिली . तात्काळ पाटील यांनी किनाऱ्याला भेट देऊन बिबटय़ाचे पाऊलांचे ठसे तपासले व त्यांना  पी ओ पीमध्ये टाकून संग्रहित केले.  त्याप्रसंगी ग्रामस्थ माजी सरपंच राजेश साखरकर ,शैलेश दिवेकर ,संजय गाणार ,महेंद्र चौलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांनी बिबटय़ाच्या पाउलांची  खात्री केल्यावर पुहा बिबटय़ा जंगलात जाण्याची पाऊले देखील सापडली म्हणजे बिबटय़ा किनाऱ्यावर येऊन पुन्हा जंगलात गेल्याचे खात्री झाली पण तो बिबटय़ा पुन्हा येण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी गावात दवंडी पिटवली की  ५ ते ६ दिवस किनाऱ्यावर सायंकाळनंतर एकटय़ाने फिरू नये .

रात्रीच्या वेळी बिबटय़ा दिसल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा किंवा वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम करावे. फणसाड अभयारण्य नांदगाव किनाऱ्याला लागून असल्याने बिबटय़ा अन्नाच्या शोधार्थ खाली उतरला असावा. असा वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा तर्क आहे.