गेली दोन ते तीन वर्षे रेंगाळलेल्या बालिकाश्रम रस्त्याच्या कामाबाबात आत्तापासूनच गंभीर तक्रारी सुरू झाल्या आहेत. मुख्यत्वे पाणीपुरवठय़ाच्या फेज-२ योजनेच्या अनुषंगाने अनेक त्रुटी पुढे आल्या आहेत. या योजनेसाठी येथे जुनीच कालबाहय़ जलवाहिनी पुन्हा वापरण्यात आल्याची तक्रार करण्यात येते. यातच आर्थिक गैरव्यवहाराचा संशय घेतला जात असून या कामाच्या दर्जाबाबतही तक्रारी सुरू आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी विजय बोरूडे यांनी याबाबत तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी याबाबत महानगरपालिकचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी संबंधित अधिका-यांना या तक्रारीची तातडीने शहानिशा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या, मात्र पुढे त्याकडे डोळेझाकच झाली असून या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय बोरूडे यांनी व्यक्त केला. यापुढेही दखल न घेतल्यास याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सावेडी रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या बालिकाश्रम रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून सुमारे २० कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम कमालीचे रेंगाळले आहे. त्याची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे येथील नागरिकही आता या गैरसोयीने जाम बेजार झाले आहेत.
या कामाबाबत आता आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. या व अन्य रस्त्यांची कामे सुरू असतानाच शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी फेज-२ योजना मंजूर झाली असून तेही काम रखडले आहे. मात्र या रस्त्यांची कामे करताना त्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. त्यानुसार बालिकाश्रम रस्त्याचे काम पूर्ण करतानाच पाणीपुरवठा योजनेच्या फेज-२ ची जलवाहिनी व तत्सम कामे पूर्ण करण्यात आली, त्यातच येथे मोठय़ा त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यत्वे फेज-२ ची जलवाहिनी टाकताना जुनीच सामग्री वापरण्यात आल्याचा आरोप बोरूडे यांनी केला आहे. तशी तक्रारही त्यांनी केली आहे. पुढच्या पंचवीस वर्षांचे नियोजन करून त्यादृष्टीने फेज-२ ही योजना कार्यान्वित केली जात आहे. मात्र येथील अत्यंत जुनी व कालबाहय़ झालेली जलवाहिनीच पुन्हा वापरण्यात आल्याचे सांगण्यात येते. जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाली असून ती मुळातच गळकी आहे. येथे नव्या जलवाहिनीची पूर्तता दाखवून प्रत्यक्षात जुनीच जलवाहिनी वापरण्यात आल्याचा आरोप बोरूडे यांनी केला आहे. यात काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. या रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यान ते सुडके मळा या अंतरात ही जुनीच जलवाहिनी टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या सगळय़ा प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी बोरूडे यांनी केली आहे. काही अंतरापर्यंत हा रस्ता तयार झाला असला तरी त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. काम पूर्ण होण्याच्या आधीच काही ठिकाणी या सिमेट काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डेही पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.