तीन नगरपालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन ठिकाणी एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत जोरदार मुसंडी मारली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीची चांगलीच घसरगुंडी उडाल्याचे पहावयास मिळाले. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला एकही पालिका आली नाही. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकेका जागेसाठी झगडावे लागल्याने डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून मनसे पुढे आला असताना ईगतपुरी पालिकेवर पुन्हा भगवा फडकाविण्यात शिवसेना यशस्वी झाली.
नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर तर नंदुरबारच्या नवापूर, नंदुरबार व तळोदा पालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक धक्कादायक निकाल बाहेर आले. आगामी सिंहस्थामुळे लक्षवेधी ठरलेल्या त्र्यंबकेश्वर पालिका निवडणुकीत मनसे १७ पैकी सहा जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. तर, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ३, अपक्ष २, भाजप व शिवसेना प्रत्येकी एक, याप्रमाणे निकाल लागले. ईगतपुरी पालिकेत १८ पैकी ११ जागा मिळवित शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या तर काँग्रेस, मनसे, भाजप व शिवसेनेला साथ करणाऱ्या पर्यटन विकास आघाडीला आपले खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित आणि काँग्रेसचे खा. माणिकराव गावित व माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांच्यातील बेबनावामुळे गाजणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यावर पुन्हा एकदा पकड मिळविण्यात काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळविले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला जोरदार धक्के दिले. नंदुरबार पालिकेत ३७ पैकी ३६ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता कायम राखताना राष्ट्रवादीची धुळधाण उडविली. यापूर्वी पालिकेत राष्ट्रवादीचे १२ सदस्य होते. त्यांच्या ११ जागा काँग्रेसने अक्षरश: हिसकावून घेतल्या. नवापूर पालिकेत १८ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता विजयाची परंपरा कायम ठेवली. राष्ट्रवादीला चार तर एक अपक्ष विजयी झाला. तळोदा नगरपालिकेतही काँग्रेसने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. एकूण १७ पैकी काँग्रेसने ११ जागा तर भाजपने चार व शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला. सर्व जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी साफ धुडकावून लावले. त्यांना एकही जागा मिळाली नाही.