केंद्र शासनाच्यावतीने देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आंध्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रावर मात केली असून राज्यातील मुंबई आणि नागपूर या प्रगत शहरांचा क्रमांक अन्य शहरांच्या तुलनेत सर्वात शेवटी आला आहे. तर नगर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे विद्यार्थी मात्र हुशार ठरले आहेत.

केंद्र शासनामार्फत एनसीईआरटीच्या माध्यमातून नॅशनल अचिव्हमेन्ट सर्व्हे करण्यात आला. देशभरातील अनुदानित सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची पर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून गुणवत्ता तपासण्यात आली. यात महाराष्ट्राची शैक्षणिक अधोगती ठळकपणे नोंदविण्यात आली आहे. मानव संसाधन व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकताच हा अहवाल त्यांच्या खात्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील शैक्षणिक आलेख देखील असमाधानकारकच आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शालेय शिक्षणाबाबत ठणठणगोपाळ असल्याचेच या अहवालातून समोर आले आहे.

मुंबई उपनगरात इयत्ता आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानात ३५ टक्के देखील गुण मिळवता आले नाहीत. रांगड्या कोल्हापूरची परिस्थितीही तशीच. गणित आणि विज्ञानात कोल्हापुरातील विद्यार्थी ३८ टक्क्यांवर अडकले आहेत. नव्याने स्थापन झालेला पालघर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या गुणवत्ता एकाच टप्प्यावर अडकल्या आहेत. सर्व विषयात विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा टक्का ३५ टक्क्याच्या खाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तिन्ही वर्गांच्या तुलनेत तिसरीतील विद्यार्थ्यांनी पाचवी आणि आठवीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर मात केली आहे. राज्यात इयत्ता तिसरीच्या वर्गात सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याखालोखाल रत्नागिरी दुसरा, सातारा तिसरा, अहमदनगर चौथा तर सोलापूर, बीड आणि गडचिरोली या जिल्ह्यांनी अनुक्रमे पाचवा, सहावा आणि सातवा क्रमांक पटकावला आहे. पाचवीच्या सर्वेक्षणातदेखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आले आहेत. तर गडचिरोली, बीड आणि उस्मानाबादने चौथे, पाचवे आणि सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

या सर्वेक्षणात विदर्भातील गडचिरोली वगळता एकाही जिल्ह्याला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविता आलेले नाही. यावरुन विदर्भाचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून आले आहे.

 

विज्ञानात पुण्याची तर भाषेत मुंबईची पिछाडी

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील इयत्ता आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे विज्ञान राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कच्चे आहे. विज्ञानात पुणे पिछाडीवर तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांच्या भाषेची अडचण आहे. विज्ञानात पुण्याची तर भाषेत मुंबईच्या विद्यार्थ्यांचा सर्वात शेवटचा क्रमांक आहे.

 

राज्यातील पहिले पाच जिल्हे

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे राज्यातील जिल्ह्यांचा स्वतंत्ररीत्या शैक्षणिक आलेख समोर आला आहे. तिसर्‍या वर्गात सिंधुदुर्ग जिल्हा ८२.१७ टक्के गुण प्राप्त करुन पहिल्या क्रमांकावर आला आहे. रत्नागिरी ८१.४५, सातारा ८०.३२, अहमदनगर ७७.३९, बीड ७६.७४, सोलापूर ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ७१.१५ टक्के गुण घेऊन पहिल्या पाचमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.