News Flash

Coronavirus: घरपोच दारु पोहोचवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यावर डॉ. अभय बंग यांची टीका

डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

Coronavirus: घरपोच दारु पोहोचवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यावर डॉ. अभय बंग यांची टीका

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये दारूची दुकानं उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारू दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व फिजिकल डिस्टंसिंगची तोडमोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांनी घरपोच दारू पुरवण्याचा विचार करावा, अशी सूचना केली आहे. पण घरपोच दारूचा परिणाम घरपोच करोना, घरपोच हिंसा आणि पाच लक्ष मृत्यूच्या स्वरुपात देशाला भोगावा लागणार, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी दिली आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

करोना पसरू शकतो या भीतीने अनेक घरपोच सेवा बंद करण्यात आल्या. त्या न्यायाने घरपोच दारू म्हणजे ‘घरपोच करोना सेवा’ ठरू शकते. दारू न पिताच फिजिकल डिस्टंसिंगची शिस्त तोडणारी माणसे दारू पोटात व डोक्यात गेल्यावर घरी व अन्यत्र फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करतील का? आणि भारतात अशी पाच कोटी दारूग्रस्त माणसे आहेत. दोन पाच हजार तबलिगींना दोष देणारे शासन ५ कोटी करोना प्रसारक समाजात घरपोच मोकळे सोडणार? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

न्यायालयाला दारू ही नागरिकांची मूलभूत गरज व हक्क वाटतो का? असा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, “पुरुष गर्दी करतात ती प्रत्येक सेवा घरपोच सुरू करावी का? दारूच्या नशेत पुरुष घरात बेताल वागू शकतात, ते बघणार्‍या घरातील लहान मुलांवर काय परिणाम होतील? घरपोच दारूमुळे स्त्रियांवर घरपोच हिंसा होईल. सर्वोच्च न्यायालयने या परिणामांचा विचार केला का? न्यायालयाने किमान एवढे तर लक्षात ठेवायला हवे होते की, भारताच्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दारूबंदी व दारूच्या दुष्परिणामांचे नियंत्रण हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालय त्या नियंत्रणाऐवजी घरपोच दारू पोचवा असे म्हणते आहे. न्यायालयाच्या या सूचनेची तपासणी करायला हवी. विरोध करायला हवा, अंमलबजावणी नाही.”

“राज्य शासनाला उत्पन्नाची तातडीने गरज आहे म्हणून दारू दुकाने उघडली असे शासन म्हणते. पण त्यामुळे जर फिजिकल डिस्टंसिंगचा भंग व करोनाचा प्रसार होणार असेल तर मग जीव महत्वाचे की उत्पन्न? आणि जीवांपेक्षा उत्पन्न महत्वाचे असल्यास मग करोनाचा फैलाव थांबवायला गेले पंचेचाळीस दिवस पूर्ण देशाच्या व जनतेच्या उत्पन्नाला उगाच का थांबवून ठेवले आहे? शासनाची गल्लत होते आहे. उत्पन्नही महत्वाचे आहे. पण दारूमधून शासनाला मिळणारा महसूल म्हणजे ‘उत्पन्न शासनाला, भूर्दंड समाजाला’ हे कितपत योग्य आहे? निव्वळ आर्थिक परिभाषेत बोलायचे तर अनेक तज्ज्ञांनी दारूमुळे उत्पन्नापेक्षा समाजाला जास्त मोठी किंमत चुकवावी लागते असे दाखवून दिले आहे. पीजीआय, चंदीगढ या भारत सरकारच्या शिखर संस्थेच्या तज्ज्ञांनी (डॉ. शंकर प्रिंजा, राजेशकुमार) आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याचा हिशोब प्रकाशित केला आहे. त्यानुसार २०११ ते २०५० या चाळीस वर्षात भारतातील सरकारांना दारूपासून जितका कर मिळेल त्यापेक्षा दरवर्षी अडीच लक्ष कोटी रुपये किंवा देशाच्या जीडीपीच्या पावणेदोन टक्का एवढे जास्त नुकसान होईल.”

वडेट्टीवारांच्या टिपण्णीला दिले उत्तर 

“जगात आज होणार्‍या एकूण रोग, मृत्यू व अपंगत्वाच्या सर्वोच्च सात कारणांमधे दारू एक आहे. भारतात दरवर्षी दारूमुळे पाच लक्ष मृत्यू होतात. मंत्री विजय वडेट्टीवारांनी असा संशय व्यक्त केला आहे की, शासनाकडे नसलेली आकडेवारी डॉ. अभय बंगांकडे असते. त्यांच्या माहितीसाठी सांगतो भारतासाठी हा मृत्यूंचा आकडा जागतीक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे. दारूबंदी असलेल्या भारतातील पाच राज्यांचा अभ्यास करुन हार्वर्ड विद्यापीठ व वर्ल्ड बँकेच्या तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, दारूबंदीमुळे त्या राज्यातील स्त्रियांवरील हिंसा व गुन्हे ५० टक्क्यांनी कमी झाले. हेच लॉकडाउनच्या काळात अधिक प्रखरतेने घडले असणार. म्हणजे आता उत्पन्नासाठी शासन दारू खुली करेल तर त्यामुळे स्त्रीयांवरील हिंसा व गुन्हे दुप्पट होणार, निर्भयाकांड दुप्पट होणार.”

“दारूची दुकाने उघडल्यावर जी वेड्यासारखी गर्दी गोळा झाली त्या माणसांची आपल्याला काळजी वाटायला हवी. दारूसाठी अतिआतूर, अस्वस्थ झालेले व सर्व नियम, काळजी, धाब्यावर बसवणार्‍या या पुरुषांपैकी अनेक जण वस्तूतः दारूवर अवलंबित (डिपेंडंट) किंवा दारूमुळे होणार्‍या विविध दुष्परिणामांनी ग्रस्त असावेत. भारतात जवळपास वीस कोटी माणसं दारू पितात, त्यांपैकी पाच कोटी हे दारू दुष्परिणामग्रस्त आहेत व त्यांपैकी दरवर्षी पाच लक्ष मरतात. हा झाला दारूचा जमाखर्च. करोनाला थांबविण्यासाठी भारताने दारू व तंबाखूविक्री बंद केली आहे. करोनामुळे आजपर्यंत देशात २ हजार मृत्यू झाले. दारुमुळे दरवर्षी ५ लक्ष व तंबाखूमुळे १० लक्ष मृत्यू होतात. करोनाच्या निमित्ताने दारू व तंबाखू बंदी किंवा कमी झाल्यास अनेक पट मोठा फायदा होईल. शासनाने, समाजाने ही आलेली संधी गमावू नये,” अशी प्रांजळ सूचनाही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 9:36 pm

Web Title: dr abhay bang criticised the suggestion of supreme court of india to home delivery of liquor aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण, ३७ मृत्यू, संख्या १९ हजारांच्याही पुढे
2 शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही: उद्धव ठाकरे
3 चंद्रपुरात उद्यापासून रोबोट करणार रुग्णसेवा; करोनाविरुद्धच्या लढ्यात नवा प्रयोग
Just Now!
X