डॉ. अभय बंग यांचा सरकारला सवाल

गडचिरोली : सरकार एकीकडे कर्जमाफी, शिवभोजन असे चांगले उपक्रम राबवत आहे. परंतु ज्यांना  शिवभोजन देणार त्यांनाच नंतर  दारू पाजणार का? असे करणार असाल तर तुमचे सर्वच चांगले उपक्रम निर्थक ठरतील, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रपूर मध्ये एप्रिल २०१५ साली लागू झालेली दारूबंदी हटवण्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

डॉ. बंग म्हणाले,  मला ही बातमी अविश्वसनीय वाटते. कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी जेव्हा डॉ. राणी बंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या तेव्हा त्यांनी दारूबंदीला पाठिंबा व्यक्त केला होता.  सरकारने चांगल्या मार्गाने  उत्पन्न वाढवावे. दारूमुळे रस्ते अपघात होतात. कॅन्सरसारखे रोग होतात. त्यामुळे दारूपासून मिळणारा पापाचा कर कोणत्याही शासनाने वाढवू नये. दारूबंदीमुळे अवैध दारू वाढली हा शब्दच्छल आहे. कारण दारूबंदीनंतर सर्वच दारू अवैध ठरते. वस्तुत: बंदीमुळे दारू कमी होते. चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू होण्यापूर्वी आम्ही जिल्ह्याचे नमुना सर्वेक्षण केले. त्यावेळी कायदेशीर, बेकायदेशीर अशी दोन्ही प्रकारे १९२ कोटी रुपयांची दारू खपत होती.

दारूबंदी नंतर एक २वर्षांने केलेल्या सर्वेक्षणात ९० कोटी रुपयांची दारू कमी झाली. उरलेली दारू कशी कमी करायची, हा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा प्रशासकीय प्रश्न आहे. तिथे पूर्वीचे शासन कमी पडले. अजित पवार उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपली क्षमता दारूबंदी सारख्या चांगल्या गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी वापरावी, असेही डॉ. बंग यांनी म्हटले आहे.

.. तेव्हा पाप कसे दिसले नाही – वडेट्टीवार

डॉ. अभय बंग दारूपासून मिळणाऱ्या कराचा पैसा हा पापाचा पैसा आहे, असे म्हणतात. मग संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करायला हवी, असे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.  राज्यात भाजप युतीचे सरकार असतांना बंग यांना हे पाप दिसले नाही. कारण, तेव्हा त्यांचा मुलगा मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसून काम करीत होता, अशीही खरमरीत टीकाही वडेट्टीवार यांनी केली.