महाराष्ट्रात मद्यावर सर्वाधिक कर लादण्यात आल्यानंतरही मद्यशौकिनांना याचा फरक पडलेला नाही, असेच चित्र उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे. दारूमुळे समाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
मात्र डॉ. अभय बंग यांचा एल्गार महाराष्ट्र सरकारला कितपत पचवता येणार, याबाबत मतप्रवाह उमटले आहेत.
बीयरचा खप वाढला
मद्यावर सर्वाधिक कर लादणाऱ्या महाराष्ट्रात मद्यविक्रीचा उच्चांक घडला आहे. बीयरशौकिनांनी या उच्चांकात मोठा हातभार लावला असून गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत ११५२ लाख लिटर बीयर रिचविली होती. यात यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत १२.४ टक्के वाढ झाली असून हा आकडा १२९५ लाख लिटपर्यंत पोहोचला आहे.
देशी दारूही लोकप्रिय
देशी दारूची लोकप्रियताही शिखरावर असून गतवर्षीच्या तुलनेत देशी दारूची विक्री ७.४ टक्क्यांनी वाढून १३९० लाख लिटरवर पोहोचली आहे.
भारतीय बनावटीची विदेशी दारू पिणाऱ्यांचीही संख्या वाढली असून गतवर्षीच्या ५७१ लाख लिटरवरून ५९४ लाख लिटर दारू यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत मद्यशौकिनांनी पोटात रिचविल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
मद्यावरील कर वाढवून राज्य सरकारला भलेही चांगला महसूल मिळत असला तरी यामुळे स्वस्त दारूकडे लोकांचा कल वाढला आहे. यात हलक्या दर्जाची देशी दारू खरेदी केली जात आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे शौकिन देशी दारूकडे वळले आहेत. त्यामुळे बीयर आणि देशी दारूच्या विक्रीत फुगवटा आल्याचे दिसते.
 बेकायदा मद्यविक्रीवर अंकुश असल्याचा दावा राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी केला असला तरी देशी दारूकडे लोक का वळले आहेत, याचे समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही.  राज्यातील मद्याच्या महापुराबाबत पुण्यात बोलताना डॉ. अभय बंग यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना या परिस्थितीसाठी जबाबदार ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील डॉ. बंग यांना लक्ष्य केले आहे. डॉ. बंग यांच्या मते महाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे. महाराष्ट्र त्यामुळेच ‘मद्यराष्ट्र’ झाले आहे, अशी टीका डॉ. अभय बंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
दारूसाठी १४ लाख टन धान्य
महाराष्ट्र सरकारने १४ लाख टन धान्यापासून दारू गाळण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना खाण्यास धान्य मिळाले नाही तरी चालेल, परंतु पिण्यासाठी दारू मिळाली पाहिजे, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील, असे विचित्र धोरण महाराष्ट्रात राबविले जात आहे. हा प्रकार आता थांबलाच पाहिजे, असा इशारा डॉ. बंग यांनी दिला आहे.     

महाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे.
डॉ. अभय बंग
सामाजिक कार्यकर्त