News Flash

गोपछडे यांच्या उमेदवारीमुळे नांदेड भाजपला सुखद धक्का

२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नांदेड : भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेवर पाठविल्यानंतर पक्षनेतृत्वाने या खेपेला याच जिल्ह्यातील डॉ. अजित गोपछडे यांना संधी देत पक्षातील निष्ठावंतांना शुक्रवारी सुखद धक्का दिला. या निर्णयाचे आमदार रातोळीकरांसह अनेकांनी स्वागत केले.

भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८० ते २०१८ या ३८ वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातील एकाही कार्यकर्त्यांस पक्षाकडून विधान परिषदेत संधी मिळाली नव्हती. दोन वर्षांपूर्वी काही जागा रिक्त झाल्या. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रातोळीकर यांच्या पक्षसंघटना कार्यातील योगदानाची नोंद घेत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळवून दिली. रातोळीकर तेव्हा बिनविरोध निवडले गेले. त्या वेळी जिल्ह्यातून डॉ.गोपछडे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. आता दोन वर्षांनंतर त्यांना संधी देत पक्षाने त्यांच्या पक्षनिष्ठेची, रचनात्मक कार्याची नोंद घेतली.

२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपने अलीकडेच औरंगाबादच्या डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले. आता परिषदेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना, शुक्र वारी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये डॉ.गोपछडे यांचे नाव समोर येताच जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना रणरणत्या उन्हात शीतलता जाणवली. ही घोषणा झाली तेव्हा डॉ.गोपछडे नाशिकला होते. तेथूनच ते मुंबईला रवाना झाले. देवेन्द्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गोपछडे यांना उमेदवारी मिळवून देत, नांदेड जिल्ह्यातील लिंगायत समाजात एक चांगला संदेश दिला, असे आता मानले जात आहे.

दोनच वर्षांंपूर्वी भाजपने रातोळीकर यांना संधी दिल्यामुळे यावेळी नांदेड जिल्ह्यातून कोणाचाही विचार होणार नाही, अशीच एक सर्वसाधारण समजूत होती. पक्षाच्या जिल्हा शाखेने विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातून कोणाच्याही नावाची अधिकृतपणे शिफारस केली नव्हती. पक्षाचे खासदार, जिल्हाध्यक्ष व इतर नेते या संपूर्ण

प्रक्रियेपासून अलिप्तच होते; पण दोन दिवसांपूर्वी आमदार रातोळीकर यांना मात्र गोपछडे यांच्या नावाची कुणकुण लागली होती. स्वत: गोपछडे पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सतत संपर्कात होते. फडणवीस-गडकरी-गिरीश महाजन या सर्व नेत्यांशी असलेल्या सौहार्दपूर्ण  संबंधांमुळे त्यांचे नाव पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर गेले.

मागील काळात गोपछडे यांनी बिलोली विधानसभा असो किंवा नांदेड लोकसभा अशा निवडणुकींच्यावेळी पक्षाकडे वेळोवेळी उमेदवारीसाठी दरवाजा ठोठावला होता. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वाटय़ाला निराशा आली होती. मात्र त्यामुळे  पक्षाशी असलेली नाळ तुटू न देता ते वेगवेगळ्या आघाडय़ांवर अत्यंत कृतिशील राहिले. पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांना दीड वर्षांपूर्वी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर संधी मिळाली. या दरम्यान ते गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकट गेले. मराठवाडय़ातून एकाला संधी देतांना यावेळी बीड किंवा अन्य जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची परिषदेवर वर्णी लागेल, असे मानले जात असताना पक्षाने बरोबर दोन वर्षांंनंतर पुन्हा नांदेडच्या कार्यकर्त्यांस संधी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 2:07 am

Web Title: dr ajit gopchade gets bjp ticket for maharashtra legislative council poll zws 70
Next Stories
1 पालकमंत्री केदारांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी
2 रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित रुग्ण
3 जळगाव जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ११४
Just Now!
X