रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत बसवण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तलचित्र गायब झाले आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी काढण्यात आलेले हे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे तलचित्र नूतनीकरणानंतर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील तळमजल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. इमारतीच्या नूतनीकरणासाठी प्रवेशद्वारा लगत बसवण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाचे तलचित्र हटवण्यात आले. वास्तविक पाहता नूतनीकरणानंतर हे तलचित्र पुन्हा जागच्या जागी बसवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला, नूतनीकरणानंतरचा उद्घाटन सोहळाही पार पडला. मात्र ज्या रायगड जिल्ह्य़ातून बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा संदेश दिला आणि चवदार तळ्याचे पाणी सर्वासाठी खुले केले. त्या सत्याग्रहाची आठवण जागवणारे बाबासाहेबांचे तलचित्र बसवण्यात आले नाही.
शेकापचे बाळाराम पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ५० हजार रुपयांचा निधी खर्च करून है तलचित्र बसवण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव राहावी आणि चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. इमारतीच्या प्रवेशद्वारालगत एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा तर दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेबांचे तलचित्र आणि शिवतीर्थ कसे उभे राहिले याची माहिती सांगणारी कोनशिला बसवण्यात आली होती. नूतनीकरणानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवतीर्थाची कोनशिला कायम राहिली मात्र बाबासाहेबांचे काढलेले तलचित्र लावण्याचा विसर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पडला.
राज्यभरात सध्या बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी शासनस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र ज्या रायगड जिल्ह्य़ातून आंबेडकरांना सामाजिक समतेचा संदेश दिला त्या रायगडमध्ये असा प्रकार घडवा ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे दलितमित्र मधुकरराव गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तलचित्र पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावे याबाबत मी जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम सभापती आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदन दिले होते. मात्र निवेदन देऊन १० दिवस झाले तरी तलचित्र बसवण्यात आलेले नाही. जिल्हा पिरषद प्रशासनाने तलचित्र तात्काळ बसवले नाही तर उग्र आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असे दलितमित्र मधुकरराव गायकवाड यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नूतनीकरणाच्या कामासाठी तलचित्र काढले होते. तलचित्र हटवल्याबाबतची तक्रार मला प्राप्त झाली आहे. ते पुन्हा सन्मानाने बसवण्याच्या आदेश मी बांधकाम विभागाला दिले आहेत. लवकरच तलचित्र बसवले जाईल. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी सांगितले.