लेखन हे आत्माविष्काराचे उत्तम साधन आहे. त्यामुळे मनाचा ठाव घेता येतो आणि विचारशीलता जागृत राहते. लेखन, वाचन व वक्तृत्व यामधून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ‘लोकसत्ता’चा ब्लॉग बेंचर्सचा उपक्रम यात मोलाचा हातभार लावत आहे, असे मत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. बर्वे यांनी व्यक्त केले.
‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’मधील ‘बेदिलीचे बादल’ या अग्रलेखावरील लेखन स्पध्रेत हिंगोलीच्या आदर्श महाविद्यालयाचा एम.एस्सी. प्रथम वर्षांचा विद्यार्थी प्रवण खाडे याने राज्यातून दुसरे पारितोषिक पटकावले. त्याबद्दल प्राचार्य डॉ. बर्वे व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर काबरा यांच्या हस्ते प्रवणला प्रमाणपत्र व पाच हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
युवकांना लिहिते करताना त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे सांगून डॉ. बर्वे यांनी, युवकांना लेखन प्रवृत्तीकडे वळविण्याचे काम या वृत्तपत्रातून होत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष काबरा यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही लिहिते केले आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा आपणही मागे नाही, हेच प्रवणने दाखवून दिले.
‘लिहिते होण्याची संधी मिळाली’
‘लोकसत्ता’ने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ब्लॉग बेंचर्सच्या रूपाने चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी यातून मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी कसे लिहितात, या दृष्टीने त्यांच्या विचाराची जाणीव यामुळे होत असल्याचे या सत्काराबद्दल भारावून गेलेल्या प्रवण खाडे याने सांगितले.