बारामती हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचं केंद्रस्थान मानलं जातं. गेली अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या बारामतीमध्ये आता क्रिकेटची रणधुमाळी रंगताना दिसणार आहे. बारामतीमधल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाला बीसीसीआयने राज्यस्तरीय आणि रणजी सामने खेळण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये बारामतीमध्ये पहिला रणजी सामना खेळवला जाणार आहे.

१२ ते १५ फेब्रुवारी २०२० रोजी महाराष्ट्र आणि उत्तराखंडचा संघ बारामतीच्या मैदानावर खेळताना दिसतील. महाराष्ट्र रणजी निवड समितीच्या सदस्यांनी याविषयीची माहिती दिली. अनंत चतुर्दशीनंतर बारामतीच्या मैदानावर निवड चाचणी संघाचे सामने खेळवले जाणार आहे. बीसीसीआयचे अधिकृत क्युरेटर प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट देऊन, मैदान रणजी सामन्यांसाठी योग्य असल्याचा अभिप्राय दिला. यानंतर बारामतीच्या मैदानाला बीसीसीआयकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे बारामतीकरांना आगामी वर्षात केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकित बावने या खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे.

रणजी सामन्याआधीच बारामतीच्या मैदानात महत्वाच्या स्पर्धांचे सामने खेळवले जातील. १७ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या संघांमध्ये तीन दिवसीय विजय मर्चंट चषकाचा सामना बारामतीत खेळवला जाईल. या मैदानावरचा हा पहिला प्रथमश्रेणीचा सामना ठरणार आहे. यानंतर १८ ते २१ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध मुंबई यांच्यात ४ दिवसीय कुचबिहार करंडकाचा सामनाही याच मैदानावर खेळवण्यात येतील. दरम्यान हे सर्व सामना बारामतीकरांना मोफत पहायला मिळणार आहेत.