भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती उत्सवाची सांगता सोलापुरात भव्य मिरवणुकीने झाली. या  मिरवणुकीत बंदी असताना डॉ. बाबासाहेबांवरील उत्कट प्रेमापोटी काही मंडळांनी कायद्याकडे दुर्लक्ष करून डॉल्बी व डीजेंचा वापर करून प्रचंड आवाजाचा दणदणाट केला. दरम्यान, मिरवणूक संपल्यानंतर म्हणजे डॉल्बीच्या रूपाने ध्वनिप्रदूषण झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित १८ मंडळांवर गुन्हे दाखल केले. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर हे मिरवणूक सोहळ्याच्यावेळी नवीवेशीत ठाण मांडून होते. त्यांच्यादेखत डॉल्बी तथा डीजेद्वारे ध्वनिप्रदूषण होत होते. परंतु वेळीच हस्तक्षेप करण्याऐवजी पोलीस आयुक्तांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
शहरात १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला प्रारंभ झाला होता. आठवडाभर विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले. या उत्सवाची सांगता काल मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत अनेक मंडळांनी ध्वनिप्रदूषण वाढविणा-या डॉल्बी तथा डीजेंचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. याच्या दणदणाटाने अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत होते. स्पीकरच्या या भिंती लावताना कुठलीही मर्यादा पाळलेली नव्हती. त्यातून कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत होते. या मिरवणूक मार्गावर नवी वेस पोलीस चौकीजवळ पोलीस आयुक्त  रासकर हे बराच वेळ ठाण मांडून बसले होते. त्यांच्यासमोर डॉल्बी व डीजेचा दणदणाट चालू असताना त्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेणे पसंत केल्याचे दिसून आले. या वेळी यापूर्वीचे पोलीस आयुक्त हिंमतराव देशभ्रतार यांची आठवण झाली. देशभ्रतार यांनी कोणत्याही उत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बी व डीजे वापराबाबत कडक र्निबध घातले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक उत्सवाची मिरवणूक डॉल्बीविना पार पडली होती.
दरम्यान, मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी १८ मंडळांविरूध्द पर्यावरण संरक्षण कायद्याखाली फौजदारी गुन्हे दाखल केले. यात आर. जी. ग्रुप, पी. बी. ग्रुपचे प्रबुध्द भारत मंडळ, बुध्ददर्शन मंडळ, जी. एम. मागासवर्गीय सामाजिक मंडळ, छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान मंडळ, सिध्दार्थ मंडळ, रमाबाई मंडळ आदींचा समावेश आहे. यात वापरण्यात आलेल्या डॉल्बी व डीजेसह वाहने जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, तत्पूर्वी रविवारी दुपारी पार्क चौकातून (डॉ. आंबेडकर चौक) सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार व पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी सोलापूर महापालिका आरोग्य विभाग कर्मचारी मंडळ होते. या मिरवणुकीत ५६ सार्वजनिक मंडळांचा सहभाग होता. बुद्धदर्शन मंडळाने डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सुंदर सजावट केली होती. तर, प्रबुध्द भारत मंडळाने भव्य स्वरूपाचा ‘लेसर शो’ सादर करून डॉ.आंबेडकर व भगवान गौतम बुध्दाचे दर्शन घडविले. जी. एम. मागासवर्गीय सामाजिक संस्थेने पृथ्वीवर रथात आरूढ झालेले महामानव डॉ. आंबेडकरांचा देखावा मांडला होता. थोरला मंगळवेढा तालीम मंडळ, सिध्दार्थ लेझीम संघ, मिलिंदनगर मंडळ, रमापती मंडळ, दीपक निकाळजे मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांनी मिरवणुकीत उत्साह निर्माण केला. बुधवार पेठेतील बाणेकरी तालीम मंडळाच्यावतीने मलखांबासह विविध शक्तिप्रयोग तथा चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या.
फलकमुक्त उत्सव
जयंतीच्या पाश्र्वभूमीवर शहरात जवळपास सर्व रस्ते व प्रमुख लहान-मोठय़ा चौकांमध्ये डिजिटल फलकांची अभूतपूर्व अशी गर्दी असते. डिजिटल फलकांची ही गर्दी चर्चेचा विषय झालेला असतो. परंतु यंदा सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कडक प्रशासनामुळे गेल्या जुलैपासून शहरात कोणत्याही सार्वजनिक उत्सवाप्रसंगी डिजिटल फलकांना थारा मिळत नाही. त्याची परिणती डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत दिसून आली. काही मंडळांनी डिजिटल फलकांवर होणारा वायफळ खर्च टाळून त्याचा विनियोग विधायक उपक्रमांसाठी केल्याचे दिसून आले.