बौद्धिक प्रामाणिकपणा हा आंबेडकरी विचाराचे प्रमाणपत्र व्हावे, यासाठी आंबेडकरांचा ध्येयवाद आणि तळमळ अंगी बाळगावी, असे मत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्याच-त्याच गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. मात्र, त्यांचे काम सर्व जातीधर्मासाठी होते. त्यांना एका कोणत्याही चौकटीत बांधता येणार नाही. अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१८ मध्ये शेती आणि शेतकऱ्यांवर शोधनिबंध सादर केला होता. त्यात शेतीवर मोठा बोजा आहे. जोपर्यंत उद्योगांना चालना देऊन शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा भार कमी होत नाही, तोपर्यंत या क्षेत्रातील समस्या संपणार नाही, हे तेव्हा त्यांनी सांगितले होते. त्याची प्रचिती आता येत असल्याचे प्रा. नरके म्हणाले.
 जल साक्षरता आणि ऊर्जा साक्षरता हे दोन्ही शब्द डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिले. ते पहिले पाटबंधारेमंत्री आणि ऊर्जामंत्री होते. या अनुषंगाने त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांची टिपणे आता काही दिवसांतच उपलब्ध होणार असून पुराभिलेख कक्षातून मिळालेल्या संचिकांच्या आधारे डॉ. आंबेडकरांचा विकासविषयक दृष्टिकोन समोर येणार आहे. त्याचे काम सुरू असून सुखदेव थोरात ते काम करत आहेत. त्यांच्या सहकाऱ्याने मिळालेल्या प्रतींच्या आधारे माहिती देताना प्रा. नरके म्हणाले की, ‘देशातील वेगवेगळ्या १५ धरणांच्या पायाभरणीत डॉ. आंबेडकरांचे नाव आहे. पाण्याचे नियोजन, त्यावर विजेचे प्रकल्प अशी एकत्रित मांडणी करणाऱ्या डॉ. आंबेडकरांमुळे सर्वसामान्य भारतीयांना मूलभूत सुविधा कशा असाव्यात, हे कळाले. त्यांनी या संदर्भात ३० महिने अभ्यास केला होता. त्यांनी केलेला अभ्यास त्या वेळेसच्या राजकारण्यांना समजावून सांगणे, त्याच वेळी त्या विभागातील अधिकारी आणि सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविणे अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी मोठे काम उभे केले होते. त्यांनी निर्माण करून दिलेल्या संकल्प चित्रामुळे पाणी आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा दिशादर्शक प्रवास पुढच्या मंत्र्यांना आखता आला.’
बाबासाहेबांनाही ५० टक्के आरक्षण हवे होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने नेहमी आरक्षणाच्या मुद्दय़ावर चर्चा होते. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची अट टाकली आहे, असे आंबेडकरी विचारवंतही सांगतात. मात्र, बाबासाहेबांनीही आरक्षणाची टक्केवारी ५० टक्केच अपेक्षित होते. तसे घटना लिहिण्यापूर्वी झालेल्या चर्चेच्या कागदपत्रावरून पुढे येत असल्याचे प्रा. नरके म्हणाले. मात्र, ही बाब डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत, असे  म्हणवून घेणारी मंडळी विसरते. त्यामुळे आंबेडकरांचे खरे पाईक व्हायचे असेल तर बौद्धिक प्रामाणिकता जपायला हवी, असे प्रा. नरके म्हणाले.