नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत सीसीटीव्ही लावल्याने संवर्धन कार्य ठप्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील विविध वस्तूंच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी केंद्र सरकारची लखनौ येथील देशातील एकमेव ‘एनआरएलसी’ ही संस्था पार पाडत आहे. नागपुरातील ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयात या वस्तूंवर प्रक्रिया करून हा अनमोल ठेवा जतन करण्याचे कार्य सुरू आहे. मात्र, संग्रहालय प्रशासनाने जतन व संवर्धन कार्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या ‘एनआरएलसी’ या संस्थेच्या संग्रहालयातील प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावून या कार्यात अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून या वस्तू जतनाचे कार्य ठप्प पडले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काही वस्तू नागपूर जिल्ह्य़ातील शांतीवन चिचोली येथे आहेत. आंबेडकरांच्या या आठवणी असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्यात आले. मात्र संग्रहालयातील वस्तू जतनाची प्रक्रिया माहिती नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या अनेक वस्तूंना अवकळा प्राप्त झाली होती. ही बाब माध्यमांद्वारे बाहेर येताच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन यासंदर्भात एक निर्णय घेतला. त्यानुसार या वस्तूंना नवसंजीवनी देण्यासाठी संबंधित विभागाकडून मान्यता देण्यात आली. लखनौ येथे केंद्र सरकारची पुरातन वास्तूंवर प्रक्रिया करून त्यांचे जतन व संवर्धन कार्य करणारी एकमेव ‘एनआरएलसी’ (राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधान शाळा) आहे. या संस्थेला या संपूर्ण कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यास आणि एनआरएलसी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एनआरएलसीने यापूर्वी देखील मध्यवर्ती संग्रहालयातील वास्तूंना नवी ओळख दिली.  त्यामुळेच संग्रहालयाचा लौकिक वाढला. या संस्थेची प्रयोगशाळा येथे होती आणि त्याच एका कारणामुळे नागपूर सुधार प्रन्यासने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू जतनाचे कार्यदेखील याच प्रयोगशाळेत करण्याची परवानगी उपलब्ध करून दिली. बाबासाहेबांचे अनुयायी देशभरात आहेत. शांतीवन चिचोली येथील बाबासाहेबांच्या वस्तूंसोबत त्यांच्या अनुयायांच्या भावना जुळल्या आहेत. त्यामुळे जतन व संवर्धनाची प्रक्रिया पार पाडताना त्यांच्या एकाही वस्तूला धक्का लागला, तर लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात याची कल्पना एनआरएलसी संस्थेच्या संवर्धकांना आहे. यातील एकाही वस्तूंना मूळ रूपात आणताना धक्का पोहोचू नये ही काळजी त्यांना घ्यावी लागत आहे. त्याकरिता  गोपनीय पद्धतीने हे कार्य करणे आवश्यक आहे. यातील एकही वस्तू, त्या वस्तूंचे छायाचित्र किंवा त्याच्या जतन व संवर्धन कार्याची प्रक्रिया बाहेर जाता कामा नये. मात्र बाबासाहेबांच्या वस्तू जतनाच्या प्रकल्पाला  संग्रहालय प्रशासनाकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शांतीवन चिचोली येथील संग्रहालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेले कपडे, पेन, बॅग, बेल्ट, छत्री, टाईपरायटर, घडय़ाळ, नावाची पाटील, कंदील, काठी अशा सुमारे १७२ वस्तू नागपूर सुधार प्रन्यासने एनआरएलसीकडे जतन कार्यासाठी सोपवल्या आहेत. डिसेंबर २०१८ ही कार्य पूर्ण करण्याची अंतिम ‘डेडलाइन’ आहे. आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दहाच महिने संस्थेच्या हातात आहेत आणि संग्रहालय प्रशासन मात्र या जतनकार्यात अडथळे निर्माण करत आहे.

गोपनियता गरजेची

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुरक्षेच्या कारणास्तव मध्यवर्ती संग्रहालयाला संग्रहालय प्रवेशद्वार आणि महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यास सांगितले. मात्र संग्रहालय प्रशासनाने या आदेशाचा विपर्यास करत नागपूर सुधार प्रन्यास किंवा एनआरएलसीला सूचित न करता थेट प्रयोगशाळेतच कॅमेरे लावले. डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंशी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत आणि या वस्तूंची अवस्था अतिशय गंभीर असल्याने हे कार्य गोपनीयरीत्या करणे आवश्यक आहे. मात्र कॅमेरे लावल्यामुळे ही जतनप्रक्रिया बाहेर पडण्याचा धोका आहे. सामंजस्य करारानुसार एनआरएलसीला हे काम २०१८ अखेपर्यंत पूर्ण करायचे आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत याचे छायाचित्र अथवा जतनप्रक्रिया बाहेर पडता कामा नये. मुळातच या प्रयोगळशाळेत एनआरएलसीच्या संवर्धकांव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश करण्याची मुभा नाही. तरीही संग्रहालय प्रशासनाने थेट प्रयोगशाळेत कॅमेरे लावल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू जतनाचे कार्य ठप्प पडले आहे.

कला आणि पुराव्यांवरील वस्तूंचे जतन व उपचार हे वैद्यकीय शस्त्रक्रियेसारखे असतात. रुग्णालय परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात, पण शस्त्रक्रिया विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात नाहीत. रुग्णावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांवर मानसिक दबाव येऊ नये आणि त्याचा परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होऊ नये हे कारण त्यामागे असते. कला आणि पुराव्यांवरील वस्तूंचे जतन आणि उपचाराची प्रक्रियासुद्धा वैद्यकीय शस्त्रक्रियेसारखीच असते. येथेही जतन व संवर्धन कार्य करणाऱ्या संवर्धकांना कॅमेऱ्यासमोर काम करणे शक्य नसते. मात्र तरीही प्रकल्पाच्या सुरुवातीपासून संग्रहालय प्रशासनाकडून सहकार्याऐवजी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.   -बी. व्ही. खरबडे, महासंचालक, एनआरएलसी लखनौ